घरमुंबईठाणे-भिवंडी रस्त्यावरील कशेळी पूल बनला सुसाईड पॉईंट

ठाणे-भिवंडी रस्त्यावरील कशेळी पूल बनला सुसाईड पॉईंट

Subscribe

ठाणे-भिवंडी रस्त्यावरील कशेळी खाडी पूलावर सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. तसेच हा पूल आत्महत्या आणि हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी या पुलावरून फेकून देण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराकडे प्रशासनासोबत ठेकेदारांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

‘ठाणे-भिवंडी रस्ता बांधा वापर हस्तांतरीत करा’ या पद्धतीने विकसित करीत असताना कशेळी खाडी पुलाचे बांधकाम तब्बल २५० कोटी खर्च करून बनविण्यात आला आहे. परंतु या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारे नियम पायदळी तुडविले जात आहेत. पुलावर पथदिवे, सीसीटीव्ही कॉमेरे नसल्याने या पुलावरून आत्महत्या आणि दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याची तक्रार माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते किशोर जाधव यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरचा खाडीवरील पूल के. टी कंस्ट्रक्शन आणि जे.वि संगम या कंपनीने बीओटी तत्वावर बनवून या पुलासह रस्त्याच्या वापरासाठी सुमारे २००९ पासून कशेळी येथे टोल नका सुरु करून लाखो रुपयांची वसुली सुरु केली आहे. परंतु खाडीवरील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मार्गांवरील पूल बनविताना तेथील संरक्षक कठडा कमी उंचीचा बनविण्यात आला असून त्यावर संरक्षक जाळी नसल्याने या पुलावरून सदैव आत्महत्या करण्याच्या घटना घडत आहेत. तसेच हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी या पुलावरून फेकून देण्याचे प्रकार अनेक वेळा घडल्या आहेत.

पुढे घडणाऱ्या घटनांना बांधकाम विभाग जवाबदार

एका घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर जाधव यांनी त्या घटनेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला असता या पुलावर पथदिवे आणि सीसीटीव्ही लावण्या बाबत स्वतःवरची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत कशेळी यावर ढकलून स्वतः हात झटकण्याचा प्रकार समोर आला असल्याची माहिती किशोर जाधव यांनी दिली. त्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरील विजेची लाईन बाजूला करणे, नव्याने विजेचे खांब उभारणे आणि इतर कामांसाठी संबंधित ठेकेदाराने वीज मंडळाकडे पैसे जमा करून कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश करारनाम्यात असताना या बाबत कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी किशोर जाधव यांनी केली आहे. तसेच या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार असल्याने वाहन पुलाच्या कठड्यास धडकल्यास थेट खाडी पात्रात पडण्याची भीती व्यक्त केली जात असून मागील वर्षभरात सुमारे ८ ते ९ घटना या पुलावर घडल्यात आहेत. ज्यामध्ये आत्महत्या आणि घातपाताच्या घटनांचा समावेश असून या बाबत योग्य ती कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने न केल्यास भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना आणि गुन्ह्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा किशोर जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -