घरमुंबईडॉक्टरांना सुरक्षित काम करू द्या, डॉक्टर-प्राध्यापकांची मागणी

डॉक्टरांना सुरक्षित काम करू द्या, डॉक्टर-प्राध्यापकांची मागणी

Subscribe

रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आता ज्येष्ठ डॉक्टरांनी देखील पुढाकार घेतला असून या प्रकारांचा केईएममध्ये मंगळवारी निषेध करण्यात आला.

सरकारी किंवा पालिका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीची प्रकरणे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे डॉक्टरांचं मानसिक खच्चीकरण होतं. त्यामुळे, डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण द्या, या मागणीसाठी आता मार्डच्या निवासी डॉक्टरांना तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठिंबा द्यायला सुरूवात केली आहे. मंगळवारी सकाळच्या वेळेत केईएम हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापक आणि डॉक्टरांनी गर्दी केली होती. यावेळी हाताला काळी फित लावून आंदोलनही करण्यात आलं. हे आंदोलन प्रातिनिधीक असून ‘डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांबाबत कारवाई करा, डॉक्टरांना संरक्षण द्या, डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण हवंय’, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही मंगळवारी आंदोलन छेडलं. या आंदोलनात निवासी डॉक्टरांसह तज्ज्ञ डॉक्टरांनीही सहभाग घेतला. शांततेच्या मार्गाने हा निषेध नोंदवला जात असून सर्व डॉक्टर हाताला काळ्या फिती बांधून काम करणार आहेत.

डॉ. मनीषकुमार, अध्यक्ष, निवासी डॉक्टर, केईएम

हल्ल्यांमुळे रुग्णांचंच नुकसान

‘हॉस्पिटल हे रुग्णसेवा देण्याचे ठिकाण असून डॉक्टरांचे हे कामाचे ठिकाण आहे. पण, रुग्णाच्या निधनानंतर किंवा कोणत्याही घटनेनंतर रूग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना रूग्णाचे नातेवाईक वेठीस धरतात. त्यांना मारहाण केली जातं. अनेकदा हॉस्पिटलच्या मालमत्तेचेही नुकसान होतं. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टर काम करु शकत नाहीत. यातून फक्त रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे हे होणारे हल्ले निधेधार्ह आहेत’, असं हॉस्पिटलच्या प्राध्यापकांनी सांगितलं. यासंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाला लेखी निवेदन सादर करून निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘रुग्ण-डॉक्टर नातं वाढणं गरजेचं’

केईएम रूग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांनी सांगितलं की, ‘रूग्ण आणि डॉक्टरांचं नातं वाढणं गरजेचं आहे. या नात्याबद्दल चुकीचा संदेश जाता कामा नये. डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात अनेकदा आंदोलनं करण्यात आली. आता सर्व विभागातील डॉक्टर एकत्रित येऊन डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करा, अशी मागणी करत आहोत. यासाठी हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे.’


हा व्हिडिओ पाहिलात का? – हल्ला कोलकातामध्ये, जेजे हॉस्पिटलची OPD बंद

यावर बोलताना केईएम हॉस्पिटलच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. कामाक्षी भाटे यांनी सांगितलं की, ‘डॉक्टरांवर सतत हल्ले होत आहेत. पण, याची कारणं शोधली पाहिजेत. शिवाय, हेल्थ बजेट वाढवलं पाहिजे. एखाद्या खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं महिनाभराचं काम सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर एका दिवसात करत असतो. त्यामुळे, त्यांच्याकडे कामाचा ताण असतो. सार्वजनिक हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सुरक्षेवर विचार व्हावा, त्यासोबत रुग्णांच्या हक्कांचाही विचार व्हावा.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -