महिलांसाठी लोकल प्रवास असुरक्षितच

सर्वेक्षणात माहिती उघड

Mumbai

उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांची संंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र महिलांसाठी लोकल प्रवास असुरक्षितच आहे, असा अहवाल एका खासगी संस्थेने दिला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकरिता (एमआरव्हीसी) एका खासगी संस्थेने पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणू आणि मध्य रेल्वेच्या नेरळ ते कर्जत या स्थानकांदरम्यान प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांचे नुकतेच सर्वेक्षण केले. यात मध्य रेल्वेच्या विरार ते डहाणू दरम्यान ४५ टक्के, तर नेरळ ते कर्जत दरम्यानच्या ४० टक्के महिलांनी प्रवासात आपली छळवणूक होत असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या सर्वेमध्ये १८ ते २५, २६ ते ४० आणि ४१ वर्षावरील महिला प्रवाशांशी संवाद साधण्यात आला. सकाळच्या ६ते ८.३० आणि संध्याकाळच्या ६.३० ते ९ या गर्दीच्या वेळी हा सर्वे करण्यात आला. यामध्ये पश्चिम रेल्वेवरील ८६७ तर मध्य रेल्वेवरील १४२ अशा एकूण १ हजार ९ महिलांना अनुभव विचारण्यात आला. विरार ते डहाणूपर्यंतच्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणार्‍या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होत असल्याचे निदशर्नास आले.

स्थानकांत होणार्‍या गर्दीचा गैरफायदा घेत काही लोकांकडून त्रास दिला जातो, असे मत यातील अनेक महिलांनी व्यक्त केले. सुमारे ४५ टक्के महिलांनी विरार ते डहाणूदरम्यानच्या प्रवासात छळ आणि त्रास होत असल्याचे सांगितले. यातील केवळ एक चर्तुथांश महिला रेल्वे पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढे येतात. अनेक महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फेरीवाले यांच्यामुळेदेखील त्रास सहन करावा लागतो.

मध्य रेल्वेवरील नेरळ ते कर्जतदरम्यान प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांचीही स्थितीही वाईटच आहे. कर्जत स्थानकावर प्रचंड गर्दी असते. येथून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना गर्दीच्या वेळी डब्यात बसायला मिळत नाही. त्यामुळे उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सरासरी १० पैैकी ४ महिलांना प्रवासादरम्यान काही लोकांकडून छळवणूक व इतर त्रास सहन करावा लागतो. यातील ६० टक्के महिला रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करतात. तर १३ टक्के महिला हेल्पलाइनचा उपयोग करतात. महिलांच्या डब्यांमध्ये महिला पोलीस असाव्यात, अशी मागणी या सर्वेमध्ये महिलांकडून करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here