घरमुंबईशेअर्समध्ये नुकसान ! उद्योगपती हर्षद ठक्कर बेपत्ता

शेअर्समध्ये नुकसान ! उद्योगपती हर्षद ठक्कर बेपत्ता

Subscribe

वीस दिवस उलटूनही काहीच थांगपत्ता नसल्याने कुटुंबीय हवालदिल

शेअर बाजारात झालेल्या आर्थिक नुकसानानंतर अचानक कार्यालयातून निघून गेलेले उद्योगपती आणि आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे बेपत्ता आहेत. गेल्या वीस दिवसांपासून त्यांचा शोध सुरू असून त्यांचा काहीच थांगपत्ता नसल्याने संपूर्ण कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. दरम्यान दादर पोलिसांनी हर्षद ठक्कर यांच्या मिसिंगची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

मरिनड्राईव्ह येथे एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला अवस्थेत मृतदेह सापडला होता, हा मृतदेह हर्षद यांचाच आहे की नाही याबाबत संभ्रम असून मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. लवकरच त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त होणार आहे. हर्षद ठक्कर हे शहरातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते आशापुरा इंटिमेन्सस फॅशन लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दादर परिसरात एक कार्यालय आहे. 2 ऑक्टोबरला ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले होते. काही वेळानंतर ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यांनी त्यांचा मोबाईल, पाकिट आणि पासपोर्ट तिथेच ठेवला होता.

- Advertisement -

पत्रात व्यक्त केली खंत

यावेळी त्यांच्या केबीनमध्ये त्यांनी एक पत्र लिहून ठेवले होते. त्यात त्यांनी कंपनीच्या शेअर्समध्ये आलेल्या नुकसानामुळे आपण प्रचंड निराश आहोत, शेअर्ससाठी आपण आपली संपत्ती गहाण ठेवली. मात्र काही लोकांनी आपल्याविरोधात काम केल्याने मला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. आपल्याला कोणाकडून काहीच नको आहे, तशी अपेक्षाही मी कधीच ठेवली नाही. यापुढे माझे काय होणार हे मलाच माहित नाही, मला सर्वांनी माफ करावे, अनेक गुंतवणूकदारांच्या नुकसानीसाठी मी आणि मीच जबाबदार असून अन्य कोणालाही दोष देऊ नका. मी कधीच कोणाची फसवणूक केली नाही, मात्र मला माझ्याच लोकांनी दगा दिला ही खंत नेहमीच राहणार आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

तो मृतदेह ठक्कर यांचा?

दुसरीकडे हर्षद ठक्कर हे घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाही. नातेवाईक, मित्रांसह सर्वांकडे विचारपूस करुनही त्यांची काहीच माहिती मिळू शकली नाही, त्यामुळे त्यांनी दादर पोलीस ठाण्यात त्यांच्या मिसिंगची तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. याच दरम्यान मरिनड्राईव्ह समुद्रात पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटली नव्हती, तसेच ओळख पटेल अशी कोणतीही वस्तूही त्याच्याकडे सापडली नाही. हा मृतदेह हर्षद यांचा आहे का, त्यांची ओळख पटविण्यासाठी आता पोलिसांनी डीएनए चाचणी केली आहे. त्याचा अहवाल गुरुवारपर्यंत येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, कार्यालयातील कर्मचारी, नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांसह मित्र-मैत्रिणींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -