घरमुंबईसायबर गुन्ह्यांत मॅन इन द मिडलची दहशत

सायबर गुन्ह्यांत मॅन इन द मिडलची दहशत

Subscribe

कुणी तरी आहे तिथे

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाच आता पोलिसांसाठी मॅन ऑफ द मिडल हा अत्याधुनिक सायबर क्राइमचा प्रकार डोकेदुखी ठरत आहे. दोन व्यक्तींमध्ये होणारा ‘ऑनलाईन’ संवाद’ हा हॅकिंगच्या माध्यमातून तिसरा व्यक्ती पाहतो आणि त्यानंतर दोघांपैकी एकाला टार्गेट करुन त्याची फसवणूक करतो. दोघांत तिसरा बनलेल्या या हॅकरला शोधणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे. व्यावसायिक उद्देशांबरोबरच आता खासगी आयुष्यातसुद्धा या मॅन इन द मिडलमुळे त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे येत आहेत.

सायबर व्यावसायिक कामांमध्ये मोठमोठ्या कंपन्या संभाषणासाठी ई-मेल चा वापर करतात. यादरम्यान हा ‘मॅन इन द मिडल’ गुन्हेगार दोन्ही बाजुच्या व्यक्तींपैकी एकाचे ई-मेल अकाऊंट हॅक करतो. त्यानंतर दोघांत नेमके काय संभाषण होते याचे सगळे मेसेज त्याला प्राप्त होतात. त्यामुळे तो शांतपणे दोघांचे मेसेज वाचत असतो. यामध्ये प्रामुख्याने पैशांंच्या व्यवहाराची वेळ येताच हा मधला हॅकर म्हणजेच मॅन इन द मिडल सावध होतो. दोन व्यक्तींमध्ये पैशांच्या व्यवहारासाठी देण्यात आलेली बँकेची सर्व माहिती त्याला आपोआप मिळून जाते. समोरचा माणूस ज्या दिवशी त्या खात्यात पैसे टाकणार आहे त्याआधी काही दिवस हॅकर त्याला दुसर्‍या बँकेचे डिटेल्स पाठवतो आणि आधी दिलेल्या खात्यावर पैसे न टाकता नवीन खात्यावर पैसे टाकण्यास सांगतो. खात्यावर पैसे पडताच ते अकाऊंट काही काळातच बंंद केले जाते. किरकोळ रकमेसोबतच मोठमोठी रक्कम अशा पद्धतीने लंपास केली जाते. पण तपासादरम्यान हा मॅन इन द मिडल पोलिसांच्या हाती लागत नसल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकार्‍याने दिली.

- Advertisement -

अशा प्रकारचे सायबर गुन्हे हे परराज्यातून केले जात असल्याने आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. सायबर क्राईमचे गुन्हे हे अगदी कमी वेळात घडत असल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधणेसुद्धा पोलिसांना कठीण जाते. सध्या नोंदवण्यात येणार्‍या १०० टक्के तक्रारींपैकी ३० टक्के प्रकरणांमध्ये मॅन इन द मिडल ही पद्धत वापरली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे

प्रियकर-प्रेयसीमध्येसुद्धा मॅन इन द मिडलची दहशत
सायबर गुन्ह्यांत महिनाभरात मुंबई पोलिसांकडे नोंद होणार्‍या तक्रारीपैकी ३० टक्के तक्रारी या मुलींना बदनाम करणे, त्यांचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर टाकणे, त्यांचे अकाऊंट हॅक करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासादरम्यान प्रेयसी-प्रियकर यांच्यात होणारे खासगी संभाषण, एकमेकांमध्ये शेअर करण्यात येणारे खासगी फोटो हे सगळे एक तिसरा व्यक्ती पाहत असतो. तांत्रिक गोष्टींचा वापर करुन अज्ञात व्यक्ती दोघांपैकी एकाचे अकाऊंट हॅक करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याला सहज मिळून जातात. अशा व्यक्तीचा शोध लावणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये मॅन इन द मिडल ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जात असून अनेक प्रकरणांमध्ये त्याचा वापर दिसून आला आहे.

- Advertisement -

सायबर पोलिसांचा तपास रखडलेलाच
दररोज नोंद होणार्‍या असंख्य तक्रारींमुळे तपास करताना अनेक अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागते. गुन्हेगार बर्‍याचदा अशा प्रकारचे गुन्हे परराज्यातून करत असल्याने त्यांना शोधणे कठीण जाते. म्हणून महिन्याकाठी नोंद होणार्‍या जवळपास ४०० गुन्ह्यांपैकी ३० टक्के प्रकरणांचा निकाल लागतो. सायबर गुन्ह्यांची अनेक प्रकरणे रखडलेलीच आहेत. गेल्या वर्षी जवळपास वर्षभरात १० हजार तक्रारी नोंद झाल्या होत्या. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकार्‍याने दिली.

दोन व्यक्तींच्या संभाषणात तिसरा भामटा हॅकिंगच्या माध्यमातून शिरतो. त्यानंतर त्यांचा डेटा चोरतो, अशी अनेक प्रकरणे माझ्यापर्यंतही आलेली आहेत. या पद्धतीचा वापर हल्ली सुरु झाला असून मॅन इन द मिडल अ‍ॅटॅक असे त्याला नाव देण्यात आलेले आहे. मोबाईल चॅटिंग, ई-मेल वरील संभाषणात असे प्रकार होतात. पण पोलीस त्या हॅकरला शोधण्यात बर्‍याचदा अपयशी ठरतात.
-अ‍ॅड. प्रशांत माळी, सायबर कायदा तज्ज्ञ

मॅन इन द मिडल या पद्धतीचा वापर गेल्या काही दिवसांपासून होत आहे, हे जरी खरे असले तरी त्या प्रकरणांचा शोध लावण्यात बर्‍याच अडचणी निर्माण होतात. दिवसेंदिवस प्रगतशील होत असलेल्या यंत्रणांमुळे गुन्हे करताना या प्रणालीचा वापर गुन्हेगार करतो. सायबर पोलिसांची टीम सातत्याने गुन्ह्यांची उकल करण्यासाठी प्रयत्न करत असते. बर्‍याचदा राज्याबाहेर जाऊनसुद्धा तपास करावा लागतो.

– बलसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, सायबर सेल, महाराष्ट्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -