उद्धव ठाकरे आझाद मैदानात, आश्वासनानंतर आंदोलन मागे

मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर देखील आझाद मैदानामध्ये काही मराठा संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं. शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात आंदोलकांची भेट घेतल्यानंतर या आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

Mumbai
UDDHAV THACKERAY AT AZAD MAIDAN
आझाद मैदानात उद्धव ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट

गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांनी अखेर आंदोलन मागे घेतलं आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात मराठा आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आंदोलकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहाण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी आंदोलकांना दिलं. यानंतर आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. दरम्यान, आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंत सरकारला करणार असल्याचं आश्वासन देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलकांना दिलं आहे.


वाचा नारायण राणे काय म्हणतायत आरक्षणावर – माझ्या अहवालाचेच विधेयकात रुपांतर!

विधिमंडळात एकमताने मंजूर झालं आरक्षण

हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव होता. विरोधकांनी देखील विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राज्य सरकारला या मुद्द्यावरून घेरलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण कशा स्वरूपात देता येईल, या पार्श्वभूमीवर अहवाल सादर केला होता. याच अहवालाच्या आधारे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर देखील आझाद मैदानात ज्या मराठा बांधवांनी या आंदोलनादरम्यान आपले प्राण गमावलेले होते, त्यांचे कुटुंबिय आझाद मैदानात आंदोलनाला बसले होते. अखेर उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असल्यांच या आंदोलकांना सांगितलं. ‘विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे, तसेच ते न्यायालयातही नक्कीच टिकणार आहे. विधिमंडळात सर्वांनी ते एकमताने मंजूर झाले आहे. न्यायालयात ते टिकवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे मराठ्यांवर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही. मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाख झाले आहेत, ते देखील मागे घेण्यात यावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांना आम्ही करणार आहोत’, अशा आशयाचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – आरक्षणासाठी मुस्लिमांनीही आता जीव द्यायचा का? – इम्तियाज जलील

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here