घरमुंबईठाण्यात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

ठाण्यात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

Subscribe

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यामध्ये शहराच्या वाहतुकसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून राष्ट्रीय महामार्ग आणि इतर मार्गांवर १०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’ असून प्रत्येक अपघात स्थळाची संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची एक समिती प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करणार आहे. तसेच त्या अपघातस्थळी कोणती उपाययोजना तातडीने करावी लागेल यावर कार्यवाही करेल. आज, गुरुवार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यावेळी दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजना तातडीने सर्व संबंधित विभागांनी कळवाव्यात, असे सांगण्यात आले. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी रस्ता सुरक्षेच्या विषयाचा आढावा सुप्रिम कोर्टासमोर जात असल्याने अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्याने अपघात कमी कसे होतील. याची काळजी घेण्याची सुचना केली.

सर्वाधिक अपघात होणाऱ्या जागा ‘ब्लॅक स्पॉट्स’ 

यावेळी समितीचे सदस्य सचिव तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी माहिती दिली की, ठाणे शहर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर १८ आणि राज्य महामार्गावर १२, इतर मार्गांवर २९ असे ५९‘ब्लॅक स्पॉट्स’ आहेत. ठाणे ग्रामीण भागात राष्ट्रीय महामार्गावर २७, राज्य महामार्गावर ११ असे ३८ तर नवी मुंबई भागात १० आणि द्रुतगती महामार्गावर १ असे १०७ ‘ब्लॅक स्पॉट्स’ आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा व तालुका मार्ग आदी रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणाऱ्या ठिकाणांना ‘ब्लॅक स्पॉट्स’म्हणून घोषित करण्यात आले आहे. रस्ते अपघातात दरवर्षी १० टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील मुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचप्रमाणे राज्य तसेच जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची निवड करण्यात आली. या अपघाती आणि धोकादायक ठिकाणी बांधकाम विभागांनी आवश्यक ती दुरुस्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रुग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा ऑडिट आदी कामे सातत्याने करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

रस्ते दुभाजक तुटणे मुख्य कारण

शहापूर ते पुढे कसाऱ्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक काही ठिकाणी तोडलेले आहेत असे निदर्शनास आले आहे यावर बैठकीत चर्चा झाली. मार्गालागाताचे पेट्रोल पंप्स, धाबे, हॉटेल्स तसेच गावकऱ्यांनी आपापल्या सोयीसाठी हे दुभाजक तोडून वाट केल्याने याच ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. याशिवाय शहापूर ते पडघा मार्गालगत ग्रामपंचायतीकडून गावातील कचरा व डेब्रिज टाकल्या जातात, तसेच त्याला आगी लावल्यामुळेही धूर होतो आणि दृश्यमानता कमी होते, अशा प्रकारची दाखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग अधिकारी तसेच पोलिसांनी संबंधितावर त्वरित कारवाई केली पाहिजे असे सांगण्यात आले.

बसेस मध्येच रस्त्यात थांबवू नये

याशिवाय एसटी बसेस रस्त्यात मध्येच कुठेही थांबविल्या जातात त्यामुळे देखील अडथळा येऊन अपघात वाढतात असा मुद्दा उपस्थित झाला. ठाणे विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी यावर आम्ही चालाक्ना सक्त सुचना दिल्या असून whatsapp क्रमांक जाहीर केला आहेआणि त्यावर कोणीही अशा बसेसची छायाचित्र टाकल्यास त्वरित कार्यवाही करण्यात येते, अशी माहिती दिली. शिवाय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने चालकांचे आणि वाहकांचे नियमित प्रशिक्षण सुरु असल्याचेही सांगितले.

- Advertisement -

सरकारी कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून यावे

हेल्मेट आणि सीट बेल्ट न लावल्यास संबंधित वाहकाला २ तासांचे समुपदेशन करण्यात येते. याकाळात त्याला या विषयाचे व्हिडिओ दाखविण्यात येतात तसेच काही अधिकारी मार्गदर्शन करून संबंधित व्यक्तीस जाणीव करून देतात. दर गुरुवारी ठाण्याबरोबरच कल्याणमध्ये देखील, असे समुपदेशन केले जाते, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी यावेळी दिली. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि विभागातील दुचाकी वाहन वापरणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून आले पाहिजे असे परिपत्रक काढण्याचे ठरले.

महत्वाच्या हेल्पलाईन्स

राष्ट्रीय महामार्गावर कुठेही अपघात किंवा काही दुर्घटना घडल्यास १०३३ किंवा ९०९६४५६४५६ अशा हेल्पलाईन्स असून घटनास्थळाच्या अंतरानुसार १३ मिनिटांत प्रतिसाद दिला जातो आणि आवश्यक ती मदत, रुग्णवाहिका वगैरे उपलब्ध होते. ही सेवा पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने आणि परिणामकारक रीतीने चालविली जाते, यातून अनेकांचा जीव वाचला आहे अशी माहितीही यावेळी देण्यात आली. वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी देखील विशेषत: ग्रीन कॉरिडोरच्या संदर्भात किंवा कुठल्याही प्रकारे रुग्णवाहिकेची गरज असल्यास ८२८६३००३०० किंवा ८२८६४००४०० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे सांगितले. या बैठकीस ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापक नाशिक दिलीप पटेल, सिव्हील सर्जन डॉ. कैलास पवार यांची उपस्थिती होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -