घरमुंबईकिमान समान कार्यक्रम मसुद्यात अनेक घोषणांना कात्री

किमान समान कार्यक्रम मसुद्यात अनेक घोषणांना कात्री

Subscribe

शिवसेनेची १० रुपयांची थाळी, काँग्रेसच्या बेरोजगार भत्त्याबाबत लवकरच घोषणा

महाराष्ट्रात सध्या होऊ घातलेल्या महाशिवआघाडीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी सध्या किमान समान मसुदा तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. हे काम सुरु असताना तिन्ही पक्षांचे जाहीरनामे एकत्र करून अंतिम मसुदा तयार करण्यात येणार असून या अंतिम मसुद्यात तिन्ही पक्षांच्या अनेक मोठ्या घोषणांना कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. ज्यात प्रामुख्याने शिवसेनेची १० रुपयांची थाळी आणि काँग्रेसने जाहीर केलेला बेरोजगार भत्ता यांना स्थान नसेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष सोडवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी हातमिळवणी केली आहे. त्यांनी सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या नव्या आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी तिन्ही पक्षांकडून गुरुवारी समन्वय समितीची एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर एक अंतिम मसुदा तयार करण्यात आला. या मसुद्यात तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यातील अनेक घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु अंतिम मसुद्यात शिवसेनेच्या १० रुपयांच्या थाळीच्या घोषणेचा समावेश करण्यात आलेला नाही. शिवसेनेच्या महत्वपूर्ण घोषणेपैकी एक घोषणा म्हणून ही घोषणा पहिली जात होती. तर काँग्रेसकडून निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून बेरोजगारांना मासिक पाच हजारांचा भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेला पण कात्री लावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.या दोन घोषणा वगळता तिन्ही पक्षातील जाहीरनाम्यामधील अनेक गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर काही घोषणा वगळण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सध्या हा मसुदा अंतिम आहे. मात्र हा मसुदा पुढे अंतिम मान्यतेसाठी पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर जर काही सूचना असल्यास किमान समान कार्यक्रमात बदल करून आम्ही पुढे जाणार आहोत. पण सध्याच्या मसुद्यात या दोन महत्त्वाच्या घोषणा नाहीत, असे सुत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -