घरमुंबई'सेल्फी विथ खड्डा'; मनसेचा नवा उपक्रम

‘सेल्फी विथ खड्डा’; मनसेचा नवा उपक्रम

Subscribe

खड्डा आणि मुंबईकर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून चालत येत आहे. खड्ड्यांमुळे आतापर्यंत दहा पेक्षा जास्त मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. मात्र, तरीही मुंबई महापालिका याकडे गांभिर्याने बघताना दिसत नाही. याशिवाय सत्तेत असलेला शिवसेना आणि भाजप पक्ष देखील या समस्येवर उपाययोजना करण्यास पुढे धजावताना दिसत नाही. मुंबईकर रस्त्यांवरील खड्ड्यांवर त्रस्त असताना त्यावर उपायोजना करण्यापेक्षा भाजप आणि शिवसेना पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या तयारी संदर्भातील मुद्दा हा वैयक्तीक असला तरी सत्ता असताना नागरिकांच्या समस्यांना गांभिर्याने बघने जरुरीचे आहे. खड्ड्यांच्या या जाचाला कंटाळून आता मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसेने या समस्येवर रामबाण उपाय म्हणून एक उपरोधिक आणि मिश्किल अशी स्पर्धा सुरु केली आहे. या स्पर्धेचे नाव ‘सेल्फी विथ खड्डा’ असे आहे. या स्पर्धेसंदर्भात मनसेने वर्सोवा येथील चौकाचौकांवर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमध्ये नागरिकांना खड्ड्यांसोबत सेल्फी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेने मनसेचे हे बॅनर्स हटवले आहेत.

हेही वाचा – विधानसभा मनसे ५० ते ६० जागा लढणार?

- Advertisement -

नेमके काय आहे बॅनरमध्ये?

वर्सोवा येथे मनसेचे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी सेल्फी विथ खड्डा ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धत मुंबईकरांनी भाग घेऊन खड्ड्यांसोबत एक छान सेल्फी काढून पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच यासाठी त्यांनी पारितोषिक देखील ठेवले आहेत. पहिल्या क्रमांकाला ३ हजार, दुसऱ्या क्रमांकाला २ हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला १ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा आचारसंहिता लागू होईपर्यंत सुरू असेल, असे देखील बॅनरमध्ये सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

कोकणातही मनसेची ‘सेल्फी विथ खड्डे’ स्पर्धा

दरम्यान, कोकणात देखील महामार्गावर पडलेल्या खड्ड्यावरून मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘सेल्फी विथ रस्ते खड्डा’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी देखील ५ हजार, ३ हजार आणि २ हजार अशी बक्षिसे ठेवली आहेत. मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा फटका गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना बसला होता. या खड्ड्यांमुळे या महामार्गावर अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मनसे आता खड्ड्यांवरून मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोंडीत पकडताना दिसत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -