घरमुंबईमध्यावधी निवडणूक झाल्यास भाजप-मनसे एकत्र?

मध्यावधी निवडणूक झाल्यास भाजप-मनसे एकत्र?

Subscribe

महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटपांवरून सुरू असलेली नाराजी पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी अपेक्षा भाजपला असून भाजपने त्यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. भविष्यात जर हे सरकार कोसळले तर थेट मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपने केली आहे. मध्यावधी निवडणूक राज्यात भाजप आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता असून त्यादृष्टीनेच या दोन पक्षांत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंगळवारी इंडिया बुल्स येथे झालेली गुप्त बैठक हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे. तब्बल एक तासापेक्षा अधिक चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकारणामध्ये भविष्यात वेगळे समीकरण निर्माण करण्यासाठी रणनीती ठरल्याची देखील माहिती मिळत आहे.

भाजप-मनसे जवळ येण्यात महत्वाची भूमिका भाजप आमदार आशिष शेलार निभावत असून ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चांगले मित्र आहेत. राज ठाकरे यांचे मन वळवण्यासाठी आणि राज्यातील नवीन राजकीय समीकरण तयार करण्यासाठी आशिष शेलार यांनी पुढाकार घेतला आहे. आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक देखील झाली आहे.

- Advertisement -

विशेष बाब म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेली टीका यामुळे राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधायची का? असा प्रश्न भाजपला पडला होता. मात्र झाले गेले गंगेला मिळाले आणि राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या धर्तीवर भाजपने राज ठाकरे यांच्या मनसेशी संधान बांधायला सुरुवात केली आहे.

भाजपला म्हणून हवी मनसेची साथ!

महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले किंव्हा शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र जरी लढली तरीही एकट्या पडलेल्या भाजपला कुणाची तरी मदत लागणार आहे. भाजप आणि काँग्रेस हे भविष्यात कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, हे भाजपला देखील माहिती आहे. मनसे हा भाजपच्या विचारसरणीस पूरक असा पक्ष आहे. तसेच शिवसेनेची जी व्होटबँक भाजपला कधीच मदत करणार नाही त्यातली थोडीफार जरी मनसेच्या बाजूने आली तरी भाजपची अडचण कमी होणार आहे. मनसेची मराठी मते देखील भाजपच्या फायद्याची ठरू शकतील. याचमुळे भाजपकडून सध्या मनसेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष बाब म्हणजे दोन वर्षांनंतर मुंबई महानगर पालिका निवडणूक आहे. भाजपचा मुंबई महापालिकेवर डोळा आहे. जर पालिका काबीज करायची असेल तर मनसेची साथ ही भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे. तसेच मनसेलादेखील राज्यात पुन्हा उभारी घ्यायची आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -