घरमुंबईजहाजावरील आगीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मॉकड्रिल’

जहाजावरील आगीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ‘मॉकड्रिल’

Subscribe

कोस्टगार्ड, जेएनपीटी, एससीआय, बीपीटी यांचा संयुक्त सराव

समुद्रात जहाजाच्या झालेल्या अपघातामुळे पाण्यात ऑईल मिसळून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लावलेलेे ड्रगन बार्गेज, पाण्यापासून ऑईल वेगळे करणारे हेली स्किमर, सर्व्हिलन्स करणारे हेलिकॉप्टर, अद्ययावत उपकरणे व तंत्रज्ञान, ड्रोनियर विमानाचा वापर, त्याचबरोबर जहाजाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न, जहाजातील अडकलेल्या कर्मचार्‍यांसाठी राबवलेले रेस्क्यू ऑपरेशन असे वेगवान थरारक प्रात्याक्षिक बुधवारी मुंबईच्या समुद्रात करण्यात आले. हे थरारक प्रात्याक्षिक पाहण्यासाठी 18 देशांचे प्रतिनिधी मुंबईत आले होते.

समुद्रात जहाजात झालेला अपघात, अचानक लागलेली आग, जहाजातील ऑईल पाण्यावर जमा होणे अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात समुद्रात प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यापासून ते अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या बुधवारी मुंबईच्या समुद्रात सातवे नॅशनल लेव्हल पोल्यूशन रिस्पॉन्स एक्सरसाईजचे प्रात्याक्षिक करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, ओएनजीसी व शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) यांच्या सहकार्याने हे प्रात्याक्षिक करण्यात आले. कोस्ट गार्डचे अतिरिक्त महासंचालक के. नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रात्याक्षिकांमध्ये 11 आयसीजी जहाज, एमबीपीटी व जेएनपीटीचे पाच बोटी, ओएनजीसीचे दोन मोठी जहाजे (टग), एससीआयच्या एका टँकर, त्याचबरोबर चेतक हेलिकॉप्टर आणि आयसीजी ड्रोनियर विमानाचा वापर करण्यात आला होता.

- Advertisement -

समुद्रामध्ये एखादी दुर्घटना घडल्यावर जहाजातील ऑईल समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळते. यामुळे होणार्‍या प्रदूषणामुळे समुद्रातील पाणी दूषित होण्याबरोबरच माशाच्या प्रजननावर परिणाम होऊन ते नष्ट होतात. त्यामुळे अपघातावेळी ऑईल समुद्रात पसरू नये यासाठी तातडीने ड्रॅगन बार्गेजचे कुंपण पाण्यात घालण्यात येते. ड्रॅगन बार्गेजच्या खाली जवळपास दीड मीटरपर्यंत एका विशिष्ट कापड्याचा वापर करण्यात आल्यामुळे ते ऑईल इतरत्र पसरण्यापासून रोखण्यात येते. त्यानंतर पसरलेले ऑईल ड्रॅगन बार्गेजमध्ये जमा करून त्यातून पाणी व ऑईल वेगळे करण्यात येते. त्यानंतर काही प्रमाणात पाण्यात राहिलेले ऑईल काढण्यासाठी एअरक्राफ्ट व टगच्या मदतीने पाण्यावर हेली स्किमर फिरवण्यात येते. त्यामुळे शिल्लक राहिलेले थोडेफार ऑईल समुद्राच्या तळाशी जाण्यास मदत होते. ही प्रक्रिया सुरू असताना त्यावर हेलिकॉप्टर व ड्रानियर विमानाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. तसेच दुसर्‍या बाजूला जहाजामध्ये अडकलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी वेगाने बचाव मोहीम राबवण्यात येते, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक विजय चाफेकर यांनी यावेळी दिली.

ऑईल वेगळे करण्यासाठी अपुरे कर्मचारी
दुर्घटनेनंतर समुद्राच्या पाण्यात पसरलेले ऑईल वेगळे करण्याचे विशेष प्रशिक्षण कोस्ट गार्डच्या कर्मचार्‍यांना देण्यात येते. परंतु फक्त लेव्हल दोनपर्यंतचेच प्रशिक्षण भारतामध्ये देण्यात येते. लेव्हल तीनचे प्रशिक्षण हे अमेरिका, यूके आणि मलेशियासारख्या देशांमध्ये दिले जाते. त्यामुळे पाण्यापासून ऑईल वेगळे करणार्‍यां प्रशिक्षित कर्मचार्‍यांची संख्या भारतात फारच कमी आहे.

- Advertisement -

या देशांनी लावली हजेरी
समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी कोस्ट गार्डकडून करण्यात आलेले प्रात्याक्षिक पाहण्यासाठी अमेरिका कोस्टगार्ड, ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्स, व्हिएतनाम नेव्ही, थायलँड कोस्ट गार्ड, टान्झानिया मेरिटाईम डिपार्टमेंट, नायझेरियन मेरिटाईम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड सेफ्टी एजन्सी, मोझांबी मेरिटाईम बोर्ड, मालदिव नॅशनल डिफेन्स फोर्स, मॉरिशस पोलिस कोस्ट गार्ड, केनिया मेरिटाईम अ‍ॅथोरेटी, इंडोनेशियन कोस्ट गार्ड, बांगलादेश नेव्ही, जपान कोस्ट गार्ड, कोरिया कोस्ट गार्ड, श्रीलंका कोस्ट गार्ड, कंबोडिया मेरिटाईम डिपार्टमेंट आदी देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -