घरमुंबईयुती गेली खड्ड्यात

युती गेली खड्ड्यात

Subscribe

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यात केंद्र आणि राज्य सरकारची पिसे उपटली. सरकारच्या घोषणा या घोषणाच राहिल्याचे सांगताना शेतकर्‍यांना आणि कष्टकर्‍यांना फसवण्याचे धंदे बंद करा, असा इशारा देत उध्दव ठाकरे यांनी सरकारवर आता कोणाचाच विश्वास राहिला नसल्याचे जाहीर सभेत बोलताना सांगितले. याच जाहीर सभेत उध्दव यांनी एका शेतकर्‍याला व्यासपीठावर बोलावले. त्याला कर्जमाफी झाली का, असे विचारले. या शेतकर्‍याने नाही, असे सांगताच कर्जमाफी हा सरकारचे थोतांड असल्याचे उध्दव म्हणाले. कर्जमाफी फसवी असल्याचेच हे पुरावे असल्याचे उध्दव यांनी जाहीर सभेत स्पष्ट केले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारपासून मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. या दौर्‍यात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेतकर्‍यांना धान्याचे वाटप करण्यात आले. उध्दव ठाकरेंच्या सार्‍या भाषणात केंद्रातल्या मोदी आणि राज्यातल्या फडणवीस सरकारची चांगलीच रेवडी उडवण्यात आली.

- Advertisement -

कोरड्या आणि बेताल भाषणांनी काही होणार नाही. त्यासाठी सरकारच्या डोक्यावर बसले पाहिजे, सरकारला जाब विचारला पाहिजे. सगळेचजण युती होणार म्हणून, केकळत आहेत. माध्यमांमध्येही तेच पाहातो आहे. ते माध्यमांचे आणि माध्यमांच्या संपादकांचे म्हणणे आहे. युतीचे संकेत आमचे नाहीत. त्यांचे आणि तुमचे(माध्यमांचे) आहेत. पंढरपुरातही महासभेत मी सांगितले होते. युतीचे संकेत आम्ही नाही माध्यमांनी दिले होते. युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतकर्‍यांचे काय ते बोला, असे सांगत उध्दव यांनी युतीच्या चर्चेला पुन्हा पूर्ण विराम दिला. मला युतीपेक्षा माझ्या शेतकर्‍यांचा प्रश्न अधिक महत्वाचा वाटतो असे उद्धव ठाकरे सभेत बोलताना म्हणाले.

घोषणांचा पाऊस बंद करा
राज्यातले आणि केंद्रातले सरकार म्हणजे घोषणांचे सरकार आहे. यांच्या घोषणांमध्ये जराही दम नाही. मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. पण त्यांचे पुढे काय होते, हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे. त्यांना काहीच कळत नाही. आणि याचे त्यांना काहीही वाटत नाही. घोषणा करायला तुमच्याकडे कितीकाळ राहिलाय? तुमच्या तळ्यात पाणी कोण देणार असे विचारत त्यांनी सरकारला चांगलेच फटकारले. मोदी सध्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. त्यांची ताकद मोठी आहेच. पण सरकारचीही ताकद मोठी आहे. त्यांचा सतत परदेशी दौरा सुरू असतो. ट्रम्पसोबत फोटो काढता तसं माझ्या मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांसोबतही फोटो काढा’ असे बोल त्यांनी मोदींना ऐकवले. ’इथून पुढे काहीही झालं तरी शेतकर्‍यांनी आत्महत्या करायचा विचारसुद्धा मनात आणायचा नाही. त्यांच्यासाठी शिवसेना कायम सज्ज आहे ’ असे ते म्हणाले. शेतकर्‍याच्या डोळ्यातले मला आश्रू दिसतात. केंद्राचे पथक येऊन गेले काही मदत केली का, अशक्ष विचारणा त्यांनी उपस्थितांना केली. उपस्थितांनी हात हलवत नाही, म्हणताच मग हे आले होते कशाला? लेझीम केळायला? असा सवाल केला.

- Advertisement -

राफेलहून मोठा घोटाळा पीकविमा योजनेत
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही फोल योजना असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सभेला उद्देशून बोलताना सांगितले. पीक विमा योजनांसाठी हप्ते भरण्यात आले मात्र पैसे मिळाले नाहीत, तुम्हाला मिळाले काय? असे विचारता शेतकर्‍यांनी नाही, असा जोरात सांगितले. केंद्राचा पीकविमा घोटाळा हा राफेल घोटाळ्यापेक्षा मोठा आहे आधी त्याची चौकशी करायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -