घरमुंबईडीजे; मुंबईत कायदेभंग 

डीजे; मुंबईत कायदेभंग 

Subscribe

डीजेवर उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट अनेक ठिकाणी रविवारी दिसून आला. काही मंडळांनी दबक्या आवाजात तर काहींनी पळवाटा काढत डीजेचा वापर केला.

डीजेवर उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतरही विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट अनेक ठिकाणी रविवारी दिसून आला. काही मंडळांनी दबक्या आवाजात तर काहींनी पळवाटा काढत डीजेचा वापर केला. अनेक मंडळांनी मंडपाजवळ डीजे लावून आपल्या कार्यकर्त्यांना नाचगाण्याचा आनंद मिळवून देताना पोलिसांकडून कारवाई होणार नाही याचीही काळजी घेतली. डीजेसह वाढत्या ध्वनीप्रदूषणाची दखल घेत २०२ मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली. गेल्या अनेक वर्षांपासून डीजे व गणपती विसर्जन मिरवणूक हे समीकरण घट्ट झाले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांप्रमाणे घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठीही डीजेचा वापर करण्यात येत असतो. डीजेच्या आवाजाची पातळी प्रचंड असल्याने होणार्‍या ध्वनीप्रदूषणामुळे अनेकांना त्रास होतो.

अनेक वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. ही बाब लक्षात सामाजिक संस्थेने न्यायालात डीजेवर बंदी घालण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातली होती. असे असले तरी मुंबई रविवारी अनंत चतुदर्शीदरम्यान ठिकठिकाणी डीजेचा वापर होताना दिसून येत होता.  काळाचौकी येथील गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी डीजेचा वापर केल्यास कारवाई करण्याचे पत्र दिले होते. त्यामुळे या परिसरातील मंडळांनी काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिरवणूक असेपर्यंत डीजेचा आवाज फारच कमी ठेवला तर काहींनी डीजे लावलाच नाही. परंतु काळाचौकी पोलिसांची हद्द संपून भायखळा पोलिसांची हद्द सुरू होताच या मंडळांनी डीजेचा दणदणाट सुरू केला. अशा प्रकारे पोलिसांच्या हद्दीच्या वादाचा फायदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी उचलला. त्याचप्रमाणे ‘विक्रोळीचा राजा’ या गणेशोत्सव मंडळाने ट्रकमध्ये ऑकेस्ट्राचा वापर करत पळवाट शोधून काढली. ‘विक्रोळीचा राजा’ गणेशोत्सव मंडळांनी ट्रकमध्ये ऑकेस्ट्रा ठेवला असला तरी त्यासाठी डीजेची साऊंड सिस्टिम वापरली होती. त्यामुळे ट्रकमध्ये गायक व वादक असले तरी त्याच्या आवाजासाठी डीजेची साऊंड सिस्टिम वापरल्याने पोलिसांना कारवाई करण्यातही अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे अनेक मंडळांंनी डीजे लावला असला तरी त्याचा आवाज कमी ठेवला होता. तर काही मंडळांनी मध्येच आवाज जास्त तर मध्येच कमी ठेवण्याचा प्रकार करत डीजेच्या तालावर मिरवणूक काढली होती.

- Advertisement -

घाटकोपर पूर्वेकडील समता कॉलनीच्या 512 टेनामेंट असोसिएशनने गणपती विसर्जनादरम्यान डीजे लावला होता. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचा डीजे मोठ्या आवाजात सुरू होता. पोलिसांनी येऊन समज दिल्यानंतर त्यांनी डीजेचा आवाज कमी करून मिरवणूक काढली. त्याचप्रमाणे विश्व अंजिक्य क्रीडा मंडळाने विसर्जन मिरवणुकीवेळी डीजेवरील बंदीचा निषेध म्हणून काळ्या फिती लावल्या होत्या. काही मंडळांनी मंडपाजवळ डीजे वाजवून आपल्या कार्यकर्त्यांना नाच गाण्यांचा भरपूर आनंद मिळवून दिला. यादरम्यान पोलीस आल्यानंतर डीजेचालकांनी आवाज मर्यादित करून कायद्याच्या कचाट्यात आपण अडकणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे संबधित मंडळांच्या मंडपांजवळ पोलिस आले खरे पण त्यांना कारवाई न करताच माघारी जावे लागले.

आवाजाची पातळी कमी झाली 

दरवर्षी आवाज फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणात यंदा सांताक्रूझ येथे सर्वाधिक आवाजाची नोंद झाली आहे. पोलिसांच्या समोरच याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज होत असल्याचे यावेळी सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. ११३.९ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २०१७ च्या तुलनेत हा आवाज कमी असल्याचे समोर आले आहे. त्यावेळी ११९.८ डेसिबल इतका होता. तर २०१६ साली ११६.४ इतका असल्याची नोंद करण्यात आली आहे. डिजे नसताना देखील या आवाजाची नोंद करण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  यावेळी आवाज फाऊंडेशनतर्फे करण्यात आलेल्या नोंदीनुसार खार लिकिंग रोडवर संध्याकाळी ७.४० मिनिटांनी १०४.७ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. तर जुहू गार्डन येथे ९६.४ डेसिबल इतका आवाज होता. यावेळी याठिकाणी नाशिक बाजा वाजविण्यात येत होता. तर सांताक्रूझ येथील भगवान स्टोअर परिसरात पुणेरी ढोल वाजविला जात असताना ११३.९ डेसिबल आवाज असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

आम्ही 29 वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहोत. 13 वर्षांपासून आम्ही डीजेवर मिरवणूक काढत आहोत. ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली त्याचा आम्ही निषेध करत आहोत. यावर्षी गणेश विसर्जन डीजे न लावता आम्ही केले. मिरवणुकीत काळ्या फिती लावून त्याचा निषेधही केला. – बंड्या दळवी, विश्व अंजिक्य क्रीडा मंडळ, घाटकोपर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -