घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये सदस्यांचा आवाज ‘म्यूट’

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये सदस्यांचा आवाज ‘म्यूट’

Subscribe

विद्यार्थ्यांच्या सोईसुविधा पुरवणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, शैक्षणिक कार्यक्रम राबवणे अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील प्रश्न विद्यापीठांच्या सिनेटमध्ये सोडवण्यात येतात. परंतु २५ ऑगस्टला मुंबई विद्यापीठाची आभासी पद्धतीने झालेल्या सिनेट सभेत सदस्यांचा आवाज ‘म्यूट’ करण्यात आला, तर प्रश्न उपस्थित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘हॅण्ड रेझ’ पर्यायही वारंवार नाकारण्यात येत होता. त्यामुळे आवाज दाबण्याचा प्रकार कुलगुरूंकडून होत असल्याचा आरोप सिनेट सदस्यांकडून करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाची सिनेट सभा आभासी पद्धतीने घेण्यास युवासेनेकडून विरोध झाला होता. त्यानंतरही कुलगुरू सुहास पेडणेकर आपल्या निर्णयावर ठाम राहत मंगळवारी ऑनलाईन सिनेट घेतली. मात्र सिनेटच्या सुरुवातीच्या तासामध्येच सर्वच सिनेट सदस्यांना ‘म्यूट’ करत त्यांचा आवाजच दाबण्यात आला. या सुरुवातीच्या तासामध्ये फक्त कुलगुरू व प्र-कुलगुरू यांच्याकडूनच संवाद साधला जात होता. यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सर्व सदस्यांना ‘अनम्यूट’ करण्यात आले. मात्र सदस्यांना अनम्युट केल्यानंतरही अनेकवेळा एखाद्या सदस्याने आपला प्रश्न उपस्थित करण्यासाठी स्वत:ला अनम्युट केल्यास कुलगुरूंकडून त्या सदस्याला लगेचच म्यूट करण्यात येत होते. इतकेच नव्हे तर प्रश्न विचारण्यासाठी असलेला हॅण्ड रेझ पर्यायही कुलगुरूंकडून वारंवार नाकारण्यात येत होता. काही सदस्यांनी चार ते पाच वेळा हॅण्ड रेझ केल्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्याची संधी देण्याऐवजी कुलगुरूंकडून त्यांची विनंती नाकारण्यात येत असे. त्यामुळे सदस्यांना त्यांचे प्रश्नच विचारता येत नसल्याची खंत सिनेट सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सुरुवातीच्या एका तासामध्ये एकतर्फी सुरू असलेली चर्चा नंतर दोन्ही बाजूने सुरू झाली असली तरी सिनेट सदस्यांना प्रश्न विचारण्याची फारशी संधी मात्र उपलब्ध होत नसल्याने या सिनेटमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोपही सिनेट सदस्यांकडून करण्यात आला.

- Advertisement -

येस बँक प्रकरणावरून सदस्य आक्रमक

येस बँकमध्ये १४० कोटींच्या ठेवलेल्या ठेवीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर त्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल पटलावर ठेवण्यात आला. यावेळी सर्व सिनेट सदस्य अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी महाराष्ट्र पब्लिक युनिर्व्हसिनटी अ‍ॅक्ट २०१६ मधील कलम ९४ (२) अंतर्गत गठीत केलेल्या समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. १४० कोटींच्या ठेवीचा प्रकार घडत असताना फायनान्स आणि अकाउंट समिती शांत का होती? हे प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी चौकशी टप्पा २, म्हणजेच संबंधित व्यक्तीवर एफआयआर नोंदवून त्याच्याकडून या प्रकरणांमध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट आहेत यांचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून यातील अधिक सत्य बाहेर काढावे अशी मागणी युवासेनेचे प्रदीप सावंत, बुक्टूचे डॉ.गुलाबराव राजे यांनी केली. तसेच संबंधित व्यक्तीला जाहीर करण्यात आलेला आदर्श कर्मचारी पुरस्कारही स्थगित करण्यास सदस्यांनी भाग पाडले.

पत्रकारांना प्रवेश नाकारत परंपरा खंडित

मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन सभा घेऊन या सभेपासून पत्रकारांना दूर ठेवल्याची कृती लोकशाहीविरोधी असल्याचा हल्लाबोल बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर यूनियनने (बुक्टू ) केला. या सभेसाठी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात, सुधाकर तांबोली, शीतल शेठ-देवरुखकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच पत्रकारांना शक्य झाल्यास आता सामावून घ्यावे किंवा पुढील बैठकीला उपस्थित रहाण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली. या मागणीला सभागृहातील सदस्यांनी दुजोरा दिला. मात्र त्याकडेही कुलगुरूंनी दुर्लक्ष केले. त्याचबरोबर बैठकीमध्ये सदस्यांकडून विचारण्यात येणार्‍या प्रश्नांवर कुलगुरूंना उत्तरे देण्यासाठी अधिकार्‍यांची मदत लागत असतानाही त्यांनाही या बैठकीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -