मासुंदा तलाव सुशोभिकरण नेमके कोणाच्या निधीतून

ठामपा प्रशासन, स्मार्टसिटी की खासदार निधी

Mumbai
Masunda Lake

ठाणे महानगर पालिकेच्यावतीने मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणासाठी मागील काही वर्षात कित्येक कोटीचा निधी खर्च करण्यात आला. मात्र या तलावाची दुरवस्था कायमच आहे. सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरेक्स तुटलेल्या अवस्थेत असून तलावाच्या आत काही ठिकाणी कचर्‍याची डबके निर्माण झाली आहेत. सुशोभिकरणाच्या नावाखाली हा पैसा कुणाच्या खिशात जातो याची चौकशी करावी, अशी ठाणेकरांची मागणी असतानाच आता या तलावाच्या सुशोभिकरण पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत करण्याचे ठामपाने जाहीर केले आहे. मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून व ठाणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या सोयीसाठी मासुंदा तलाव व सभोवतालचा परिसर रम्य प्रेक्षणीय स्थळ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे या परिसराच्या सुशोभिकरणासाठी नेमका किती आणि कोणाचा निधी वापरण्यात येणार असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.

ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुनियोजितपणे व्हावी यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजना समितीची बैठक नुकतीच सपन्न झाली. या बैठकीत मासुंदा तलावाच्या परिसराचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी सुमारे सहा कोटींचा खर्च केला जाणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या तलावाला हायटेक लुक देण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याकरिता स्मार्ट सिटी अंतर्गत या तलावाच्या सुशोभिकरणासह या ठिकाणी तरंग पाथवे तयार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या सर्व कामांसाठी सहा कोटी नऊ लाख इतकाच खर्च अपेक्षित असल्याचेही जाहीर करण्यात आले.

मात्र मागील महिन्यात मासुंदा तलावाच्या परिसराच्या सुभोभिकरणाच्या कामांचे भूमीपूजन एकनाथ शिंदे शिवसेना नेते, मंत्री सार्वजनिक बांधकाम व ठाणे जिल्हा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व पदपथ सुशोभीकरण, अत्याधुनिक नौका विहार, डीजीटल चित्रदर्शन, मासुंदा तलावातील शंकर मंदिराचे सुशोभिकरण, प.पु.अहिल्यादेवी होळकर घाट, खुला रंगमंच, दत्त घाट (गणेश विसर्जन तलाव), ग्लास ट्रान्सपरंट गॅलेरी व पदपथ, नाना नानी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व पदपथाचे सुशोभीकरण, सेल्फीपॉईंट, रंगोबापुजी गुप्ते चौक सुशोभीकरण, अत्याधुनिक व आवश्यक विद्युत व उद्यानविषयक विविध कामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही कामे खासदार निधी आणि ठामपाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

मासुंदा तलावाचे सुशोभिकरण केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतूनच केले जाणार आहे. खासदार हे केंद्राचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी स्मार्ट सिटीच्या निधीचा विनियोग करण्याचे पूर्ण हक्क संबंधित महानगर पालिकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे हा सर्व प्रकल्प ठामपाच्या अखत्यारितच आहे. मात्र श्रेयासाठी हा सर्व गोंधळ होत आहे. कदाचित याही प्रस्तावाचे श्रेय घेण्याकरिता हा सारा खटाटोप होत असावा असे असू शकते.
– संजय केळकर, आमदार, ठाणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here