डेब्रिज माफियांसाठी नवी मुंबई मनपा सोन्याची अंडी देणारी कोंबडी

Mumbai
navi_mumbai_municipal

नवी मुंबई महापालिकेला डेब्रिजच्या समस्येने ग्रासले आहे. मुंबई, पनवेल, ठाण्यावरून महापालिकेची हद्द वापरण्यासाठी परवानगी घेऊन त्या गाड्यांतून रात्री व पालिकेला सुट्टी असताना डेब्रिज रस्त्याच्या कडेला टाकले जाते. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात नंबर मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेला इतरांचा कचरा उचलण्यापालिकडे पर्याय उरला नसल्याचे दिसत आहे. याबाबत अखेर आयुक्तांनी डेब्रिज समस्येला गंभीर्याने घेत प्रत्येक विभागात पथक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक महिन्यांपूर्वी आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांनी घोषणा करूनही यावर निर्णय झालेला दिसून येत नाही. त्यामुळे पालिकेच्या या डेब्रिज भरारी पथकांना मुहूर्त कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

नवी मुंबईत पनवेल, मुंबई व ठाणे अशा तीन पालिकांच्या सीमा जोडलेल्या आहेत. सर्वात जास्त डेब्रिज य तीन शहरांतून येऊन नवी मुंबई अंधारात रिते केले जाते. काही दिवसांपूर्वी चक्क सायन पनवेल महमार्गावर उरण फाट्यावरच डेब्रिजचा ट्रक रिता केल्याचे पाहायला मिळाले होते. नवी मुंबईला सिडको,रेल्वे,एमआयडीसी अशा महत्वाच्या प्राधिकरणानी वेधले आहे. या प्राधिकरणाच्या ताब्यात शहरातील मोठा भूभाग आहे. मात्र या प्राधिकरणांकडे असलेले भूभाग नवी मुंबई महापालिकेला डोकेदुखी होऊन बसले आहेत.या प्राधिकरणाच्या जमिनीवर खुलेआम डेब्रिज टाकले जात आहे.

सिडकोचे भूखंड, एमआयडीसीतील भूखंड व रस्त्याच्या कडेला अंधार किंवा दिवसाढवळ्या डेब्रिज रिते केले जात आहे. नेरुळ येथे सुरू झालेल्या आरटीओ ट्रॅकवर डेब्रिज टाकले गेले असून वंडर्सपार्कमुळे शोभा आलेल्या भागाला गलिच्छतेचे रूप आलेले आहे. मात्र यासाठी असलेली पालिकेची अवघी दोन डेब्रिज पथके अपुरी पडू लागली आहेत.

मुळात इतर पालिकांतील वाहनांना डेब्रिज वाहून नेण्यासाठी नवी मुंबईची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देणे पालिकेचीच चूक ठरू लागली आहे.त्यामुळे कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीत हे डेब्रिज शहरात टाकले जात आहे.त्यातच नवी मुंबईतील खुद्द पालिकेने व सिडकोने कारवाई करून पडलेले बांधकाम तिथेच पडून राहत असल्याने पालिकेच्या स्वछता अभियानाला गालबोट लागत आहे.

अनेकवेळा घर दुरुस्ती करताना काढलेले डेब्रिज हे रात्री शहरात रस्त्याच्या कडेला टाकण्यात येते. पालिकेला अंतर्गत व बाह्य आशा दोन्ही ठिकाणी डेब्रिज माफियांना काबूत ठेवणे जड जाऊ लागले आहे. त्याचा फटका शहराच्या सौंदर्याला व स्वछता अभियानाला बसू लागला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. रामस्वामी एन. यांच्या विभागनिहाय डेब्रिज पथके नेमण्याच्या भूमिकेने डेब्रिज माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र ही पथके प्रत्यक्षात येऊ शकली नसल्याने डेब्रिज माफियांचे फावले आहे.

पनवेल, ठाणे व मुंबई या ठिकाणी डेब्रिज टाकता येत नसल्याने नवी मुंबई या माफियांना पैसे मिळवून देणारी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरू लागली आहे.त्यामुळे आयुक्तांनी तातडीने विभागनिहाय पथके नेमण्याची गरज आहे. तरच स्वच्छतेचे २०१९ सालासाठी उचललेले शिवधनुष्य पालिकेला पेलता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here