राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा; राज्यपालांकडे केली मागणी

शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीस...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. ही घटना शुक्रवारी मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे घडली. दरम्यान शिवसैनिकांनी मारहाण केल्याप्रकरणी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले. राज्यपालांकडे राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली असल्याची माहिती त्यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारने माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.

राज्यपालांनी दिले आश्वासन

मदन शर्मा यांना भेटीनंतर बोलताना दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर अधिक कठोर कलमं लावालीत अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई करु असे आश्वासनही दिले आहे. यासह बोलताना त्यांनी सांगितलं की, “मारहाण करताना शिवसैनिक आपण आरएसएस आणि भाजपाचा चमचा असल्याचा उल्लेख करत होते. आपण माजी नौदल अधिकारी असून कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. माझ्याबद्दल त्यांच्या मनात कोणी गैरसमज पसरवला आहे याची माहिती नाही”.

शिवसेनेने महाराष्ट्राची माफी मागावी

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली. यावेळी मारहाणीचं समर्थन करणाऱ्या अनिल परब यांनी मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केली.

सहा शिवसैनिकांची जामीनावर सुटका

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती. ही घटना शुक्रवारी मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे घडली. काल रात्री उशिरा याप्रकरणातील सहा आरोपी शिवसैनिकांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना आज कोर्टापुढे हजर केले. आता मुंबईच्या बोरिवली कोर्टाने याप्रकरणातील आरोपी सहा शिवसैनिकांनाचा जामीन मंजूर केला आहे.

नौदल अधिकाऱ्यांच्या मारहाणप्रकरणी १२ सप्टेंबरला एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यांची जामीनावर सुटका झाली होती. पण पुन्हा एकदा रात्री उशिरा या सहा जणांना अटक करण्यात आले आणि त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. पण आता पुन्हा एकदा या सहा जणांची जामीनावर सुटका झाली आहे.


माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण; सहा शिवसैनिकांची पुन्हा सुटका