घरमुंबईरिक्षाचालकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

रिक्षाचालकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

Subscribe

मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

अनेक महिन्यांपासून प्रलंबित मागण्यांची दखल शासन घेत नसल्याने मंगळवारी नवी मुंबई रिक्षा टॅक्सी संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून वाशी येथील शिवाजी चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक दिवसीय उपोषण हा ट्रेलर असून मागण्यांची दखल येत्या काही दिवसांत न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी आपले प्रश्न दिल्ली दरबारीदेखील मांडले होते, मात्र रिक्षा संघटनांच्या मागण्यांची कोणत्याही स्तरावर दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

सरकारने गेल्यावर्षीपासून रिक्षापरवाने खुले केल्याने अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परवाने खुले केल्याने सरकारी तसेच निमसरकारी नोकरदार वर्गाकडून रिक्षा घेऊन भाड्यावर किंवा स्वतः फावल्या वेळात जोडधंदा सुरू करतात. त्यामुळे हे खुले परवाने बंद केले जावेत. रिक्षा चालकांसाठी घोषित केलेल्या कल्याणकारी मंडळाची त्वरित अंमलबाजवणी करण्यात यावी, रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करावी, इन्शुरन्स प्रीमियममध्ये झालेली दरवाढ कमी करावी, रिक्षा स्टँडची संख्या वाढविणे, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करणे आदी प्रलंबित मागण्यांसाठी हे एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यापुढे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत योग्य दिशा ठरवली जाईल, असे समितीचे अध्यक्ष भरत नाईक यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -