भामट्यानं बाबा रहीमच्या हत्येसाठी आणलेलं पिस्तुल मैत्रिणीकडे ठेवलं आणि तिथेच फसला!

crime

गुन्हेगारीसाठी मैत्रीणीचा वापर करून मित्राने तिला गोत्यात आणल्याचा प्रकार मुंबईतील घाटकोपरमध्ये उघडकीस आला आहे. एका गुंडाला संपवण्यासाठी आणलेले पिस्तूल मैत्रिणीकडे सांभाळण्यासाठी देण्यात आले होते परंतु पोलिसांना त्याची खबर लागताच मैत्रिणीला पिस्तूलसह पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील फिनिक्स मॉल जवळ एक बुरखेधारी महिला संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ७ च्या पथकाला मिळाली होती. कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. मनीष श्रीधनकर, सपोनि. संतोष मस्तुद महिला अंमलदार आणि पथकासह गुरुवारी दुपारी सापळा रचून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याजवळील पिशवीत एक गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे सापडली.

तिच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तिचे नाव सीमा मोहम्मद फैजल खान (३४) असे असून ती घाटकोपर पश्चिम संजय नगर परिसरात राहणारी आहे, सीमाचा मित्र नजीर शेख याने तिच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. नजीर याने हे पिस्तुल बाबा रहीम याला संपवण्यासाठी आणले होते अशी कबुली सीमाने पोलिसांना दिली. नजीर आणि बाबा रहीम हे दोघे एकाच परिसरात राहणारे असून दोघेही अभिलेखावरील गुन्हेगार आहे, या दोघांमध्ये सुरुवातीपासून वाद असून हा वाद कायमचा संपवण्याच्या हेतूने नजीरने हे पिस्तूल आणून ते सांभाळण्यासाठी मैत्रीण सीमा हिच्याकडे दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांना एका गुन्ह्यात घाटकोपर पोलिसानी अटक केली होती व दोघे ही सध्या तुरुंगात असल्याची माहिती पोलिसांना समजली.

याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ७च्या पथकाने सीमाला अटक केली असून नजीर याचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसानी दिली.