घरमुंबईसाध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर अखेर बोलले राज ठाकरे!

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर अखेर बोलले राज ठाकरे!

Subscribe

लोकसभा निवडणुकांसाठी यंदाच्या प्रचारातली राज ठाकरेंची मुंबईतली शेवटची सभा भांडुपमध्ये झाली. यावेळी अपेक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजप आणि नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. मुंबईतली ही शेवटची सभा असल्यामुळे दोन्ही सत्ताधाऱ्यांवर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.

‘प्रज्ञासिंह सिग्नल तोडल्यामुळे आत होत्या का?’

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यावरून राज ठाकरेंनी यावेळी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या विधानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह समर्थन करतात याचं दु:ख प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानापेक्षा जास्त आहे. प्रज्ञासिंह सिग्नल तोडल्यामुळे अटकेत होत्या का? बॉम्बस्फोटाची केस होती. अशा व्यक्तीला तिकिट का दिलं? दहशतवाद हा दहशतवाद असतो, त्याला कोणताही धर्म नसतो. भाजपला सत्तेचा माज आहे, तेच यावरून सिद्ध होतं’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

गंगा स्वच्छ करण्याची योजना राजीव गांधींची!

भाजप सरकारच्या जाहिरातींच्या खर्चावर यावेळी राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. ‘मी इतके दिवस सांगितल्यानंतर आता म्हणतायत आम्ही उत्तर देणार. हरिसाल गावातल्या स्थानिक लोकांनीच सांगिलंय की मोदींनी सांगितलेल्या योजना फेल ठरल्या आहेत. या योजनांच्या फक्त जाहिरातींसाठी साडेचार ते पाच हजार कोटींचा खर्च केला. नमामी गंगेचा प्रकल्प राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जाहीर केला होता. पण त्याचंही श्रेय मोदींनी घेतलं. पण तरी गंगा अजूनही स्वच्छ झालेली नाही’, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

मोदींच्या स्वत:च्या गावात शौचालय नाही!

नरेंद्र मोदींनी सांसद ग्राम योजनेच्या अंतर्गत दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ यावेळी राज ठाकरेंनी दाखवला. या गावात मूलभूत सोयी-सुविधा देखील आल्या नसल्याचं या व्हिडिओमध्ये नागेपूर गावाचे गावकरी सांगत आहेत. तसेच, मोदींच्या स्वत:च्या वडनगर गावाचा बीबीसीने केलेला व्हिडिओ दाखवला. यात वडनगरमध्ये सार्वजनिक शौचालय नसल्याचं गावकरी सांगत आहेत.

- Advertisement -

महाग सिलेंडरपुढे उज्ज्वला योजना निरुपयोगी!

याशिवाय राज ठाकरेंनी मोदींनी उज्ज्वला योजनेंतर्गत मोदींना गॅस कार्ड दिलेल्या पहिल्या महिला गुड्डीदेवी यांच्यावर बीबीसीनं केलेला व्हिडिओ देखील दाखवला. ज्यात पैसे नसल्यामुळे मिळालेला सिलेंडर त्यांना भरता येत नाही. पैसे नसल्यामुळे सिलेंडर न भरता चुलीवरच स्वयंपाक करत असल्याचं या महिला बीबीसीच्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. ‘काँग्रेसच्या काळात ४१० रुपये भाव असताना भाजपकडून जोरदार टीका केली जात होती. पण आता भाजपच्याच काळात हे भाव ७५०, ८००, ९०० रुपयांपर्यंत गेले आहेत’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

‘भाजपवाले काँग्रेसपेक्षाही नालायक’

किरीट सोमय्या मोनिका मोरेच्या अपघातानंतर रेल्वेस्टेशनवरचे प्लॅटफॉर्म मोजत होता. पण तेव्हापासून आत्तापर्यंत त्यावर काहीही बोलला नाही. २०१४मध्ये मोनिका मोरेचे अपघातात हात गेले. काँग्रेस सरकारने मदतीचं आश्वासन दिलं होतं. पण मदत झाली नाही. तेव्हा भाजपनं काँग्रेसच्या नावाने भांडवल केलं होतं. पण २०१४ ते २०१७ या काळात मुंबईच्या रेल्वे अपघातात १८ हजार ४२३ मृत्यू झाले आहेत. आता काँग्रेसवाले कमी वाटतील, इतके नालायक भाजपवाले आहेत.

‘प्रधान सेवक’ हा शब्द नेहरुंच्या ‘प्रथम सेवक’वरून घेतलेला’

‘मोदींच्या डोळ्यांसमोर अजूनही नेहरू, इंदिरा गांधीच आहेत. प्रथम सेवक ही संज्ञादेखील नेहरूंनीच आणली होती. त्या प्रथम सेवकचं यांनी प्रधान सेवक केलं. पण गेली ५ वर्ष त्यांनी फक्त नेहरूंना, इंदिरा गांधींना शिव्या घालण्यातच घालवली’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -