घरमुंबईराजभवन गर्द हिरवे रान !

राजभवन गर्द हिरवे रान !

Subscribe

सहा वर्षांत हजारांहून अधिक झाडांनी बहरला परिसर ,डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अमूल्य योगदान

राजभवनात सुर्योदयाच्या वेळात फेरफटका मारताना मोर पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता त्यात आणखी एका आकर्षणाची भर पडली आहे ती म्हणजे राजभवनात झालेल्या वृक्षलागवडीची. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या अमूल्य योगदानामुळे राजभवन परिसर सहा वर्षांत फळे, फुले तसेच वनऔषधी अशा या १ हजारांहून अधिक झाडांनी बहरला आहे.

राजभवनाच्या व्हीआयपी गेट ते श्रीगुंडी मंदिरापर्यंतचा सगळा परिसर हा सहा वर्षांपूर्वी मुंबईतल्या कोणत्याही सर्वसामान्य किनार्‍या-सारखा होता. एकही झाड नाही आणि रखरखते ऊन लागणारा समुद्र किनारा अशी या परिसराची जुनी ओळख. पण गेल्या सहा वर्षांत लागवड करण्यात आलेल्या १००० हून अधिक झाडांमुळे या परिसराचे सगळे चित्रच बदलले आहे.

- Advertisement -

नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी महिनोंमहिने झाडांची केलेली मशागत आणि देखभाल याचेच यश म्हणजे राजभवनातील हा सगळा परिसर अशा झाडांनी फुलला आहे. आठवड्यातून तीन वेळा या झाडांच्या देखभालीसाठी प्रतिष्ठानचे सेवक येत असतात. एखाद्या मुलाप्रमाणे या झाडांना आम्ही जीव लावला आहे. नुसते झाड लावले की जबाबदारी संपत नाही, तर झाड वाढवणे ही त्याहून मोठी जबाबदारी असते अशी प्रतिक्रिया एका सेवकाने दिली. सुपारी, नारळ, दालचिनी, काजू, शेवगा, कोकम, फणस यांसारख्या झाडांच्या गर्दीमुळे या परिसरात आता गडद सावली असते. नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते व्हीआयपी गेटपर्यंत ठिकठिकाणी वृक्ष लागवड झाली आहे. सुपारीच्या झाडांमुळे राजभवनाला दरवर्षी चांगल्या प्रमाणात सुपारी देणेही याठिकाणी शक्य झाले आहे. त्यासोबतच आंबा, काजू, फणस यासारख्या फळांची समृद्धीही आता राजभवनात झाली आहे.

सध्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पुढाकारामुळे राजभवनात सर्वसामान्य नागरिकांना राजभवनातून सूर्योदय पाहतानाच राजभवनाची सैर करता येणे गेल्या काही वर्षांपासून शक्य झाले आहे. येत्या दिवसांमध्ये औषधी वनस्पतींच्या नर्सरीचा समावेशही राजभवनात करावा अशी विनंती नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

औषधी वनस्पतींची नर्सरी
औषधी वनस्पतींची रोपवाटिका राजभवनात तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये आंबे हळद, अक्कलकडा, रिठा, पर्णकुटी, अडुळसा, ओवा, शतावरी, पळस, बहावा, कोरफड यांसारख्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. दापोलीच्या कृषी विद्यापीठातून मुळ रोपे आणून रोपवाटिका तयार केली आहे. एरव्ही औषधी वनस्पती मुंबईत पाहण्यासाठी वेगळी अशी नर्सरी नाही. त्यामुळेच या नर्सरीच्या निमित्ताने औषधी वनस्पतींची ओळख करून देण्याचा प्रतिष्ठानचा मानस असल्याचे एका सेवकाने सांगितले.

राज्यपालांचे आंब्याचे झाड
राजभवनाच्या प्रशासकीय कर्मचार्‍यांपासून ते राज्यपाल असे सगळ्यांचे झाडांवर प्रेम आहे. आपला हुद्दा, पद सोडून अनेक अधिकारी आणि त्यांचे कुटुंबिय यांनी झाडांसाठी योगदान दिले आहे. सध्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या उपक्रमांतर्गत काही वर्षांपूर्वी परिसरात आंब्याचे झाड लावले होते. या झाडाच्या वाढीची विचारपूस राज्यपाल नेहमीच करतात. त्यांच्याच आग्रहावरून या परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची उपयुक्तता सांगणारा फलकही लावण्यात आला आहे.

राजभवनातील झालेल्या सुपारीच्या झाडांच्या लागवडीतून ८ किलो सुपारीचे उत्पादन मिळाले आहे. त्यासोबतच गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत सुमारे १००० झाडांची भर राजभवनात झाली आहे. राजभवन परिसरातच आता औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी आता नाना धर्माधिकारी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -