संजय राऊत म्हणतात, ‘कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन, पण…’

kangana ranaut sanjay raut

गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन विश्वासोबतच राजकीय विश्वात देखील खळबळ उडवून देणाऱ्या Sushant Singh Rajput Death प्रकरणाची चर्चा आहे. त्यातच अभिनेत्री Kangana Ranaut ने केलेल्या विधानांमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली आहे. कंगणाने केलेल्या ‘मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर का वाटत आहे?’ या विधानावर शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांकडून खरपूस टीका केली गेली. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगणाचा उल्लेख ‘हरामखोर मुलगी’ असा केल्यामुळे या प्रकरणात नवी चर्चा सुरू झाली असून संजय राऊत यांनी कंगणाची माफी मागावी अशी मागणी सुरू झाली आहे. त्यावर संजय राऊत यांनी ‘कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन’, असं म्हटलं आहे. पण त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

प्रसारमाध्यमांनी राऊतांना त्यांच्या वक्तव्याविषयी कंगणाची माफी मागणार का? असं विचारलं असता राऊतांनी कंगणालाचा माफीची अट घातली. ‘कंगणा मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यांसाठी माफी मागणार आहे का? तिने जर तिच्या वक्तव्यासाठी माफी मागितली, तर मी माफी मागण्याचा विचार करेन’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, ‘कंगणा ज्या प्रकारे मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणाली, तसं ती अहमदाबादला पाकिस्तान म्हणेल का?’ असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.