आदित्य महाराष्ट्राचे नेतृत्व करतील – संजय राऊत

'आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्री पद लहान असून ते पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व करतील' असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Mumbai
parlimentary party leader sanjay raut
खासदार संजय राऊत

उपमुख्यमंत्री पद हे आदित्य ठाकरेंसाठी लहान पद असून, त्यांनी तरुणांचे नेते म्हणून आपली ओळख निर्माण केल्याचे सांगत आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा अप्रत्यक्ष टोला भाजपाला हाणला. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक आकर्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. तसेच वरुण सरदेसाई यांनी तर नुकतंच ट्विट करत अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले होते.

युवासेना लागली कामाला

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवडी किंवा वरळी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता असून, युवासेना देखील कामाला लागली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघ सोडण्याची तयारी सुनिल शिंदे यांनी देखील दाखवली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत निवड़ून आणायचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवायचे, असा चंग सध्या युवासेनेने बांधल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


हेही वाचा – आयारामांच्या मंत्रिपदाच्या चर्चेमुळे शिवसैनिक अस्वस्थ!

‘लोकसभेचे उपाध्यक्षपद कुणालाही मिळू देत’

दरम्यान, ‘लोकसभेचे उपाध्यक्षपद आम्ही अजिबात मागितलेले नाही. त्या पदावर शिवसेनेचा नैसर्गिक अधिकार आहे असं आम्ही म्हटलं होतं, दावा केलेला नव्हता. एखाद्या गोष्टीची इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. लोकसभेचं उपाध्यक्षपद कोणलाही देऊ देत’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.