जलवाहिन्यांमध्ये साड्या, आधारकार्ड, पिलो कव्हर

Mumbai

मुंबई:-सध्या सगळीकडेच दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच ठाण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे महापालिकेच्या डोंगरीपाडा भागातील जलवाहिन्यांमध्ये चक्क साड्या, उशीचे कव्हर, कपडे यांच्याबरोबरच काही आधारकार्ड देखील आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांसोबतच पालिका प्रशासनही आश्चर्यचकित झाले आहे. मात्र, दुसरीकडे ‘महापालिकेच्या जलकुंभांवर सुरक्षाव्यवस्था नसल्यानेच असा प्रकार होत असल्याचा’ आरोप भाजपचे स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

पाण्याच्या टाक्या की गर्दुल्ल्यांचे अड्डे?

ठाणे महापालिकेने पाणीवितरणासाठी विविध भागात जलकुंभ उभारले आहेत. मात्र, बहुसंख्य ठिकाणी सुरक्षाव्यवस्था नाही. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर गर्दुल्ले, मद्यपी, टवाळखोरांचा वावर असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत स्थानिक नागरिक, नगरसेवकांकडून सातत्याने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा दावाही डुंबरे यांनी केला आहे.

अपुर्‍या पाणीपुरवठ्याच्या होत्या तक्रारी

डोंगरीपाडा येथील वामननगर परिसराला काही दिवसांपासून अपुर्‍या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र, तरीदेखील पाण्याचा दाब पुरेसा असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जात होता. अखेर परिसरातील स्थानिकांच्या मागणीनुसार महापालिकेकडून जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वामननगर परिसरात जलवाहिनीतून साड्या, टाकाऊ कपडे, उशीचे कव्हर आदींबरोबरच आधारकार्ड आढळले. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here