मंगल कार्यालयातून शिवसेना राष्ट्रवादीचे अमंगल

श्रेयासाठी दोन्ही पक्षात राडा

Mumbai
Shivsena MP Rajan Vichare
शिवसेना खासदार राजन विचारे

ऐरोली मधील मंगल कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला शिवसेना खासदार राजन विचारे यांना डावलण्यात आल्याने त्याच वेळी सत्ताधारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यात अमंगल कार्य घडले. या कार्याचे हाणामारीत रुपांतर घडल्याने शिवसेनेच्या तीन नगरसेकांसह अजून सहा जणांवर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वाना अटक करण्यात आली नाही तर शनिवारी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल, असा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. तर घडलेला सर्व प्रकार हा राष्ट्रवादीनेच घडवून आणला असल्याचा आरोप एम.के. मढवी यांनी केला आहे. आम्हीही नगरसेविका विनया मढवी यांचा विनयभंग केल्याप्रकरणी आमदार संदीप नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे एम.के. मढवी यांनी सांगितले.

ऐरोली सेक्टर 5 येथील श्रीमती जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालयांच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन सोहळ्याला आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भाईर, नगरसेवक एम.के.मढवी उपस्थित होते. या उद्घाटनाच्या सोहळ्यावेळी नगरसेवक एम. के. मढवी यांनी खासदार राजन विचारे आल्यानंतर उद्घाटन करण्याचा घाट घातला होता. मात्र 10 वाजून 30 मिनिटे गेल्यानंतर देखील खासदार राजन विचारे आले नसल्याने महापौर जयवंत सुतार यांनी फित कापून मंगल कार्यालयाचे उद्घाटन केले. या उद्घाटनला खासदार राजन विचारे यांची वाट न पाहताच उद्घाटन केल्यामुळे नगरसेवक एम. के. मढवी व त्यांचे कार्यकर्ते संतापले व आमदार संदीप नाईक यांना या प्रकरणी त्यांनी जाब विचारला. त्यावेळी वादग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याचवेळी परिस्थितीचे भान ठेऊन राष्ट्रवादीचे संदीप नाईक हे घटनास्थळावरुन निघून गेले. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ऐकमेकांत भिडले. या प्रकरणाची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी लागली असता त्यांनी ही बाब उपायुक्तांच्या माध्यमातून पोलिसांना कळवली होती. तरीही पोलीस वेळेवर न आल्याने अखेर वादाचे कारण हाणामारीत झाले.

शिवसेनेच्या नगरसेवकाने मला मारण्याचा कट रचला होता. हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याने याची कुणकुण महापौर जयवंत सुतार यांना लागलीही होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना सतर्कतेचे आवाहन केले होते. मात्र पोलीस वेळेवर न आल्याने नगरसेवक करण मढवी यांनी त्यांच्या साथीदारांसह हातात कैची आणि सळ्या घेऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वेळीच माझ्या अंगरक्षकांनी मध्यस्थी केल्याने अनुचित प्रकार टळला. माझ्यावर हल्ला करण्यात त्यांना अपयश आल्याने अखेर त्यांनी रागाच्या भरात माझी गाडी फोडली. त्यामुळे नगरसेवक मनोहर मढवी,करण मढवी,नगरसेविका विनया मढवी यांच्यासह अजून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जर त्यांना अटक नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू.
-संदीप नाईक, आमदार

माझ्या प्रभागात असलेल्या या मंगल कार्यालयाचे श्रेय आम्हाला मिळू नये म्हणून हे कटकारस्थान राष्ट्रवादीने रचले आहे. मी फक्त त्यांना खासदार येणार आहेत. 5 ते 10 मिनिट थांबा अशी विनंती केली. ते न ऐकता त्यांनी लोकापर्ण सोहळा आटोपता घेतला. यावर त्यांना जाब विचारला असता त्यांची काही कार्यकर्ते माझ्या अंगावर धावून आले. त्याचवेळी त्यांनी नगरसेविका विनया मढवी यांचाही विनयभंग केला. या प्रकरणी आमदार संदीप नाईक, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार व त्यांचे बंधू वैभव नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.                -एम.के.मढवी, शिवसेना नगरसेवक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here