घरमुंबईआदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

Subscribe

शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे म्हणून आदित्य येणारी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. २०१० च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आदित्यला नऊ वर्षांपूर्वी राजकारणात आणले. मात्र अल्पावधीतच आदित्य यांनी सर्व निवडणुकांत महत्त्वाची कामगिरी बजावल्याने आदित्य यांनीच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेत मागणी वाढू लागली आहे.

आदित्य यांचा २९ वा वाढदिवस ‘मातोश्री’वर मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. पण वाढदिवसापेक्षा आदित्य महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार याचीच चर्चा अधिक होती. कारण शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आदित्य यांची महाराष्ट्राला गरज असल्याची भावना सकाळपासूनच व्यक्त करायला सुरुवात केली होती. एवढेच नाही तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी तर आदित्य यांनी राजकारणात उतरावे आणि राज्याचे नेतृत्व करावे यासाठी सर्व आमदारांसह मातोश्री गाठली.

- Advertisement -

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती होणार असून, विधानसभेसाठी ५०-५० चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तसेच अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री असा फॉर्म्युला अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ठरल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच सध्या आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उमेदवार असावेत, अशी भावना शिवसेनेकडून व्यक्त होत आहे. आदित्य ठाकरे हे सर्वात तरूण असल्याने त्यांना जर मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले तर शिवसेनेला एक वेगळी दिशा मिळेल आणि महाराष्ट्राला सर्वात तरुण मुख्यमंत्री मिळेल, असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते.

ठाकरे कुटुंबाचा कुणीतरी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून थेट मुख्यमंत्री बनेल यापेक्षा दुसरा आनंद शिवसैनिकांना नसेल, अशी भावना शिवसेनेच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी यासाठी अनेक आमदारांनी आपला मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आदित्य ठाकरे हे वरळी किंवा शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच ‘आपलं महानगर’ने दिली होती. तसेच आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेना कामाला लागली आहे. आदित्य ठाकरेंना निवडून आणून त्यांना मुख्यमंत्री बनवायचे, असा निर्धारच युवासेनेने केला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्राला गरज असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य यांचे मौन

आदित्य ठाकरे यांना तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार का, असे विचारले असता त्यांनी मौन बाळगत अधिक बोलणे टाळले. तसेच माझ्या हातून चांगले काम व्हावे असेच आपण वागत आहोत. दुष्काळ आणि अकरावी प्रवेश या दोन मुद्यांवर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. दुष्काळी भागात पीक विम्याच्या तांत्रिक गडबडीवर लक्ष देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली आहे. तसेच रोजगार हमीच्या कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्रीपद हे आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. आदित्य हे तरुणांचे नेते आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राचे नेतृत्व करतील. – संजय राऊत, खासदार, शिवसेना

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात विधिमंडळात यावे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करावे ही शुभेच्छा त्यांना दिली आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव आणि विश्वासार्हता तसेच शिवसेनेची किर्ती ते टिकवून ठेवतील अशी अपेक्षा आहे.– निलम गोर्‍हे, प्रवक्त्या, शिवसेना

आदित्यने अल्पकाळात राजकीय जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवल्याने मुख्यमंत्रीपदी आदित्य बसल्यास मलाही आवडेल.
– मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -