Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर मनोरंजन Sushant Singh Rajput Case: भाजप आक्रमक, मविआच्या तरुण मंत्र्यावर आरोप

Sushant Singh Rajput Case: भाजप आक्रमक, मविआच्या तरुण मंत्र्यावर आरोप

सीबीआय चौकशीची मागणी, युवा मंत्र्याचा पोलिसांवर दबावाचा आरोप

Mumbai
Uddhav Thackeray and Devendra fadnavis
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सरकार - विरोधकांमध्ये जुंपली

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी ट्विटद्वारे केली आहे. तर बिहारचे भाजप उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. तर सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाच्या तपासात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वागणुकीकडे बघितल्यावर तसे होणार नाही. पण याप्रकरणी ईडीने तरी ईसीआयआर दाखल करुन मनी लॉन्ड्रिंग आणि मनी ट्रेलिंगबाबत चौकशी करावी, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

मुंबई पोलीस सहकार्य करत नाहीत

बिहार पोलिसांच्या पथकामार्फत मुंबईत सुरु असलेल्या चौकशीवरुन पाटण्यातील बिहार पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात उच्च स्तरीय बैठक सुरु आहे. याशिवाय बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी मुंबई पोलीस बिहार पोलिसांच्या पथकाला सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. बिहार पोलिसांच्या तपासात मुंबई पोलीस अडथळा आणत आहेत. बिहार पोलीस याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणाची दखल घ्यावी, असे भाजपला वाटत असल्याचे सुशील कुमार मोदी म्हणाले.

रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ व्हायरल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण नव्या वळणावर आले असताना रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ माहिती अधिकार कार्यकर्ते बिनू वारगीस यांनी देखील ट्विट केला आहे. या व्हिडीओत रियाकडून खंडणीचा उल्लेख केल्याचे निदर्शनास येत आहे.

युवा मंत्र्याचा दबाव

सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासात एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत, असा आरोप भाजपचे आमदार आणि प्रवक्ते अतुल भातकळकर यांनी केला आहे. तसंच सीबीआयने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केली आहे, असेही भातकळकर म्हणाले आहेत.

 

ठाकरे सरकारमधील तो तरुण मंत्री कोण?

मुंबई पोलिसांनी यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा का दाखल केला नाही, असा टीकेचा भडीमार करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरच्या अडचणी वाढवल्या आहेत. भातखळकर पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने पार्थ यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ती मान्य होत नाही. ही एक साधारण आत्महत्या असेल तर पोलिसांनी केस बंद का केली नाही. सर्वसामान्य जनतेत आणि समाज माध्यमातून सरकारमधील तरुण मंत्र्याच्या दिशेने दिशानिर्देश होणार्‍या चर्चेकडे पोलीस का डोळे झाक करत आहेत? सुशांतच्या आई- वडिलांशी पोलीस का बोलत नाहीत? हे प्रश्न सरकारला अडचणी वाढवणारे ठरतील. दिंडोशीचे आमदार असलेले भातखळकर म्हणाले, बिहार पोलीस पथक तपासासाठी शहरात आले आहे. त्यांना मुंबई पोलीस का सहकार्य करत नाही. तपास रेंगाळत ठेवून न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा हक्कही सरकार हिरावत असल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केलाय.

राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे खडे बोल

भाजपच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आले आहे. ते म्हणाले की, “सुशांतसिंग राजपूत प्रकरणात विरोधक कदाचित इंटरपोल किंवा नमस्ते ट्रम्पचे कर्मचारी देखील तपासात आणू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतले पाहीजे की, हे तेच पोलीस आहेत ज्यांच्यासोबत त्यांनी मागचे पाच वर्ष काम केले आहे. हे तेच पोलीस आहेत ज्यांनी कोरोनाच्या काळात बहुमुल्य योगदान दिले आहे. पोलिसांवर बोट दाखवणाऱ्यांचा मी निषेध करतो. मुंबई पोलीस हे सक्षम आहेत. जर कुणाकडे पुरावे असतील तर त्याने ते पोलिसांसमोर ठेवावेत, गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे काम आम्ही करु. कृपया या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यात मतभेद निर्माण करण्यासाठी करु नका. जर कुणी यामध्ये राजकारण करु इच्छित असेल तर त्यासारखी वाईट गोष्ट नाही.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here