ठाणे लोकसभा निवडणूक

Subscribe

राज्यातील सर्वाधिक नागरिकीकरण झालेला परिसर अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा शिवसेनेचे राजन विचारे निवडणूक रिंंगणात असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादीने माजी खासदार आनंद परांजपे यांना निवडणुकीत उतरवले आहे. ठाणे स्थानकातील किरकोळ कामे वगळता राजन विचारे यांची खासदारकीची कारकिर्द फारशी प्रभाव टाकू शकलेली नाही. मात्र एकनाथ शिंदे यांचे नेतृत्त्व आणि संघटनेची ताकद या दोन बाबी त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे खासदारकीचा अनुभव असलेल्या आनंद परांजपे यांना पक्षातील बुजुर्ग गणेश नाईक यांची साथ आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघात नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या तीन महापालिका आहेत. त्यापैकी नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचे वर्चस्व असून त्यांनी त्यांची सर्व ताकद आनंद परांजपे यांच्या पाठीशी उभी केली आहे. खरेतर प्रदीर्घ काळ पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे नेतृत्त्व करणार्‍या गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवावी, अशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. मात्र नाईक कुटुंबियांनी त्यास नकार दिला. मात्र आनंद परांजपे यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. उमेदवारी अर्ज भरतेवेळी आनंद परांजपे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीत त्याची चुणूकही दिसून आली.

- Advertisement -

नवी मुंबई परिसरातून आनंद परांजपे यांना जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न नाईक कुटुंबीय करणार आहेत. त्यांच्या दृष्टीने ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकांची ती रंगीत तालीम असणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर पुढील वर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणूनही राष्ट्रवादी कार्यकर्ते या निवडणुकीकडे पाहत आहेत. गणेश नाईक आणि आनंद परांजपे दोघांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेतून केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. आता हे दोघे मिळून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राजन विचारेंचा कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे या जिल्ह्यातील आजी माजी पालक मंत्र्यांमध्ये कुणाची सरशी होणार हेही या लढतीतून दिसणार आहे.

ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यावरील आपली पकड आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने या निवडणुकीत कार्यकर्त्यांची फळी उतरवली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण या दुसर्‍या मतदार संघातून त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. मध्यंतरी समाज माध्यमांद्वारे ठाण्यातील उमेदवारांच्या शिक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला होता. त्यानंतर आनंद परांजपे यांचा चेहरा राष्ट्रवादीतर्फे मतदारांपुढे आणला जात आहे. जुन्या ठाण्यातील मध्यमवर्गियांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

पायाभूत सुविधांचा गंभीर प्रश्न

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अपुर्‍या पायाभूत सुविधा ही या मतदार संघाची प्रमुख समस्या आहे. नवी मुंबईचा अपवाद वगळता ठाणे लोकसभा मतदार संघातील इतर शहरी विभागाची परिस्थिती दयनीय अशीच आहे. या मतदार संघातील लाखो प्रवासी अद्याप मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवेवर अवलंबून आहेत. मात्र प्रवासी संख्येच्या तुलनेत सुविधा अपुर्‍या आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील प्रस्तावीत विस्तारीत ठाणे स्थानक अद्याप अस्तित्वात येऊ शकलेले नाही. या स्थानकामुळे ठाणे स्थानकातील गर्दीची कोंडी सुटू शकेल. सध्या जुन्या-नव्या ठाणे शहराच्या मधून पूर्व दृतगती मार्गाला समांतर घोडबंदरपर्यंत मेट्रोची कामे सुरू आहेत. कल्याण-भिवंडी मेट्रोचेही भूमिपूजन झाले आहे. मात्र ही सर्व स्वप्ने वेळेत पूर्ण होतील का याबाबतीत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात शंका आहे.

खासदारांपुढील आव्हाने
चाळीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या मतदार संघात पुरेशी वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्याचे सर्वात मोठे आव्हान खासदारांपुढे असणार आहे. गेल्या काही वर्षात मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये सरकते जिने, आरोग्य क्लिनिक आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र त्यामुळे प्रवाशांना फारसा दिलासा मिळालेला दिसला नाही. लवकरात लवकर अतिरिक्त मार्गिका टाकून उपनगरीय फेर्‍या वाढविणे हाच त्यावरचा उपाय आहे. भावी खासदारांना त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -