घरमुंबईएसएनडीटीच्या दूरस्थ शिक्षणात गुणपत्रिकेचा गोंधळ

एसएनडीटीच्या दूरस्थ शिक्षणात गुणपत्रिकेचा गोंधळ

Subscribe

हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

आशियाईतील प्रथम महिला विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) सध्या निकाल गोंधळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातील अनेक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होऊनही अनेकांना गुणपत्रिका मिळाली नसल्याचे गंभीर बाब समोर आली आहे. तर काही पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल ही जाहीर झाला नसल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मात्र विद्यार्थ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून आमच्यापर्यंत कोणतीही तक्रार आली नसल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) दूरस्थ विभाग ही चालविले जाते. ज्या विद्यार्थिनी काम करुन शिक्षण घेत असतात त्यांच्यासाठी शिक्षणाचे कवाडे खुले करुन देण्यासाठी या विद्यापीठात मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतले जातात. या दूरस्थ विभागामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एकूण १२ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. गेल्यावर्षी सुमारे २१ अभ्यासक्रमे सुरु होती. मात्र युजीसीच्या नव्या नियमानंतर आता हा आकडा १२ अभ्यासक्रमांवर आला आहे. तर गेल्यावर्षी एसएनडीटीच्या परीक्षा विभागाने विक्रमी वेळेत निकाल लावत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देखील दिला होता. यंदा मात्र काही निकालांना लेटमार्क लागल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा विभागातर्फे एप्रिल २०१८तर्फे ज्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, अनेक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होऊन महिने उलटले तरी बर्‍याच विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मुळात विद्यार्थ्यांना पोस्टामार्फत मार्कशीट घरपोच देण्यात येते. या गोंधळात मार्कशीटला उशीर लागल्याची माहिती एसएनडीटीतील सूत्रांकडुन देण्यात आली आहे. तर एसएनडीटी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थीनीच्या परीक्षा ही नियमित परीक्षा झाल्यानंतर घेण्यात येते. त्यामुळे काही निकालांना लेटमार्क लागल्याची माहिती एसएनडीटीतील एका विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले असून त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेता येत नसल्याची तक्रारही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, यासंदर्भात एसएनडीटीच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. सुभाष वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र निकाल गोंधळाचे वृत्त फेटाळून लावले आहेत. सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जवळपास पूर्ण झालेले आहेत. तर विद्यार्थ्यांचे निकाल ही सर्व पूर्ण झाले असून ते संबंधित विभागांना पाठविण्यात आलेले आहेत. विभागामार्फत हे निकाल पोस्टाने विद्यार्थिनींच्या घरी पाठविण्यात येतात. या प्रक्रियेमुळे काही त्रुटी राहिल्या असतील तर विद्यार्थिनींना निकाल मिळालेला नसेल. पण सर्व निकाल पाठविण्यात आल्याची माहिती वाघमारे यांनी यावेळी दिली. तर ज्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा किंवा गुणपत्रिकेची तक्रार असेल तर त्यांनी तातडीने परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, विद्यापीठ तातडीने तो प्रश्न निकाली काढतील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

ग्रामीण भागातील विद्यार्थिंनीना फटका
दरम्यान, या निकाल आणि गुणपत्रिका गोंधळाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील विद्यार्थीनींमुळे बसत आहे. निकालांसाठी त्यांना केंद्रावर खेटा माराव्या लागत असून यामुळे त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -