घरमुंबईझाडांना केलं जातंय बोडकं

झाडांना केलं जातंय बोडकं

Subscribe

पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्या तसेच मृत झाडे शास्त्रोक्तपणे कापली जात नसून पुन्हा एकदा कंत्राटदारांकडून झाडांना बोडके केले जात आहेत. झाडांची लाकडे अधिकाधिक मिळवण्यासाठी महापालिकेतील जुन्या कंत्राटदारांकडून खोडापर्यंत फांद्यांची छाटणी करण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना काही विभागातील झाडांना विद्रुप केले जात आहे.

मुंबईतील झाडांच्या पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्यासाठी महापालिकेने २४ विभागांसाठी कंत्राट निवडीबाबत निविदा मागवली. परंतु निविदेमध्ये झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्तपणे छाटणी व्हावी यासाठी आरबोरिस्टची अट घालण्यात आली होती. शिवाय यांत्रिक पध्दतीने सुरक्षितपणे छाटणीचाही त्यात समावेश केला होता. परंतु याला काही जुन्या कंत्राटदारांनी विरोध केल्यानंतर, तसेच राजकीय नेत्यांकडून ही निविदा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर या अटी वगळून जुन्याच पध्दतीने निविदा मागवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले. त्यानुसार सध्या २४ विभागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु यामध्ये वाहतूक कंपन्या आणि नालेसफाईचे काम करणार्‍या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया सुरु असतानाच मुंबईतील जुन्या कंत्राटदारांच्या मदतीने छाटणीच्या कामाला महापालिकेने सुरुवात केलेली आहे. जुन्या कंत्राटदाराचा कालावधी १५ एप्रिलपर्यंत असून त्याचा फायदा उठवून कंत्राटदारांना पुन्हा लाकडे लुटायची संधी दिली आहे.

- Advertisement -

एप्रिलमध्ये मुंबईतील विविध भागातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये डी विभागातील भुलाबाई देसाई मार्गावरील झाडांची छाटणी करण्यात आली आहे. यामध्ये एकही फांदी न ठेवता केवळ खोड दिसेल अशाप्रकारे लाकडांसाठी झांडाची छाटणी झालेली आहे. महापालिकेने शास्त्रोक्तपणे फांद्यांची छाटणी करण्यासाठी आरबोरिस्टची अट घालून मागवलेली निविदा रद्द करून जुन्याच पध्दतीने निविदा मागवली. त्यावेळी ‘आपलं महानगर’ने मुंबईतील झाडे पुन्हा बोडकी होणार अशी भीती वर्तवली होती. ती भीती आता खरी होताना दिसत आहे.

‘डी’ विभागातील झाडांच्या फांद्यांच्या छाटणीबाबत वॉचडॉग फाऊंडेशनचे गॉडफ्री पिमेंंटा यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. ही छाटणी बेकायदा आहे. फांद्या शास्त्रोक्तपणे कापण्याऐवजी सरसकट तोडण्यात येत असल्याने झाडे बोडकी होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा निवारा संपुष्टात येत आहे. वृक्ष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फांद्यांची छाटणी केली जाईल असे महापालिकेने न्यायालयात सांगितले होते, पण प्रत्यक्षात तसे होत नसल्याचे पिमेंटा यांनी सांगितले.

- Advertisement -

झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीऐवजी बेकायदा पद्धतीने छाटणी करण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकराची सखोल चौकशी करण्यात यावी.
– गॉडफ्री पिमेंटा, संस्थापक, वॉचडॉग फाऊंडेशन

नवीन कंत्राटदारांबाबत आपल्याला माहित नाही. महापालिकेकडे जे कंत्राटदार आहेत, त्यांच्याकडून फांद्यांची छाटणी केली जात आहे.
– विश्वास मोटे, सहायक आयुक्त, ‘डी’ विभाग, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -