घरमुंबईपालिकेचे वाशी हॉस्पिटल ओस

पालिकेचे वाशी हॉस्पिटल ओस

Subscribe

डॉक्टर नसल्याने रुग्णांना डिस्चार्ज

निलंबित डॉक्टरांच्या समर्थनार्थ मनपाच्या मुख्य डॉक्टरांनी अचानक मनपा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याने त्यांचे परिणाम रुग्णालयावर पडले आहेत. निर्णय घेणारा डॉक्टरच नसल्याने बहुतांश रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे अतिदक्षता विभाग, ई वार्ड, महिला वैद्यकशास्त्र वार्ड, पुरुष वैद्यकशास्त्र वार्ड ओस पडले आहेत. डॉक्टरांनी राजीनामे देऊन पाच दिवस उलटले तरी ते कामावर हजर न झाल्याने रुग्णालयाची परस्थिती कधी पूर्वपदावर येणार, अशी चर्चा रुग्णालय वर्तुळात सुरू झाली आहे. यावर मनपा आयुक्त एन. रामास्वामी ही गप्प असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मनपा आयुक्त एन रामास्वामी यांनी राजकीय दबावापोटी कोणतीही चौकशी समिती न नेमता वाशी मनपा रुग्णालयातील डॉ. शरीफ तडवी आणि डॉ. प्रभा सावंत यांना निलंबित करत डॉ.प्रशांत जवादे (मुख्य वैद्यकीय अधीक्षक) व डॉ.किरण वैराळ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) यांची विभागीय चौकशी लावल्याने इतर डॉक्टरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जे तडवी व सावंत यांच्याबरोबर झाले ते भविष्यात आमच्या बरोबरही होऊ शकते या भीतीने आणि तडवी व सावंत यांना पाठिंबा देण्यासाठी रुग्णालयातील मुख्य डॉक्टर अतिरिक्त आयुक्तांकडे राजीनामे सादर करून सुट्टीवर गेले आहेत. मुख्य डॉक्टर सुट्टीवर गेल्यानंतर अतिदक्षता विभाग, इ वार्ड, महिला वैद्यकशास्त्र वार्ड, पुरुष वैद्यकशास्त्र वार्ड मध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे या वार्ड मध्ये शुकशुकाट पसरला आहे.

- Advertisement -

या रुग्णालयात नवी मुंबईसह पनवेल, उरण, ठाणे व कल्याण डोंबवली विभागातून रुग्ण उपचारासाठी येतात. रोज हजारोंच्या संख्येने या ठिकाणी ते येत असल्याने आता उपचारासाठी जायचे कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. रुग्णांवर उपचारादरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, पण यावेळी विकी इंगळे प्रकरण रुग्णालय प्रशासनाच्या चांगलच अंगलट आल्याने त्यांचा फटका हजारो रुग्णांना बसला आहे. मनपा रुग्णालयाचा तुलनेत इतर दुसरे रुग्णालय शहरात नसल्याने रुग्णांची फरपट होऊ लागली आहे.

नेहमी मी या रुग्णालयात उपचार घेत असतो, मंगळवारी मी माझ्या बहिणीला या ठिकाणी आणले असता रुग्णालयात शुकशुकाट आढळून आला. त्या ठिकाणी डॉक्टर रजेवर असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही दुसरीकडे उपचार केले.
– संदीप म्हात्रे, रुग्ण, नेरूळ

- Advertisement -

ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आलेले नाहीत. ते लवकरच हजर होतील.
– महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -