केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात शॉर्टसर्किट; अडीच महिन्यांचा चिमुकला भाजला

Mumbai
kem hospital
केईएम हॉस्पिटल

केईएम हॉस्पिटलच्या बालरोग विभागात गुरुवारी अचानक शॉर्टसर्किट झालं. या घटनेत केईएममध्ये हृदयावर उपचार घ्यायला आलेला अडीच महिन्यांचा चिमुरडा प्रिन्स गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधून मुंबईत दाखल झाला आहे. दरम्यान, शॉर्टसर्किटच्या घटनेत इतर मुलं सुखरुप असल्याचं ही सांगण्यात आलं आहे.

नेमके काय घडले?

उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली होती. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचे कळले. त्यामुळे, कुटुंबिय बाळाला आपल्या भावोजींच्या घरी दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी तपासणी करत मंगळवारी बाळाला अॅडमिट करुन घेतलं. बुधवारी मध्यरात्री २.५० वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला आहे.

अचानक मशीनच्या वायरमध्ये आग लागल्यामुळे आणि बेडवर ठेवलेल्या कागदाच्या गठ्ठ्याला आग लागली. सध्या बाळाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे आणि त्याची प्रकृती नाजूक सांगितली जात आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत.  – पन्नेलाल राजभर; प्रिन्सचे वडील

दरम्यान, दुसरीकडे हॉस्पिटल प्रशासनावर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अशा घटना घडणं म्हणजे अतिशय संवेदनशील असल्याचं बोललं जात आहे.

हृदयाच्या ट्रीटमेंटला बाळ दाखल‌ झालं आहे. तर, शॉर्टसर्कीटमुळे फ्रिक फायर‌ झालं. परिचारिका आणि‌ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाळाला वाचवलं. प्रिन्सशिवाय दुसऱ्या कोणत्याच बाळाला हानी झाली नाही.  डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम हॉस्पिटल


हेही वाचा – ठाण्यात खाडी किनारी मातीचा भराव; अनधिकृत चाळी खारफूटीच्या मुळावर