नक्की काय ठरतंय ?

Mumbai

ठरलंय!

जागावाटप आधीच ठरले होते – उद्धव ठाकरे

uddhav-thackeray
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच आमचे जागावाटप ठरले होते . आमच्या युतीत कुठलाही तिढा नाही. येत्या एक-दोन दिवसांत युतीची घोषणा होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी सेनाभवनात शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. युती होईल अशी परिस्थिती आहे. मात्र सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल.
नाणारबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, नाणारचे जे काही व्हायचे आहे, ते आधीच झालेले आहे. आरेबाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरून आहे. त्यामुळे युतीमध्ये गोंधळण्यासारखे काहीच नाही.

दोन्ही पक्षात कुठलीही खळखळ नसल्याचे सांगितले. दोन दिवसांत सर्व काही समजेल. तसेच मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेची यादी जाहीर करावी, हे उपहासात्मक नसून आम्ही यावेळी वेगळी पद्धत अवलंबली असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. सेनेचे सचिव अनिल देसाई यांनी युती होणारच यावर ठाम असल्याचे सांगितले.

ठरायचंय!

युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही – चंद्रकांत पाटील

युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. युती १०० टक्के होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप निश्चित नाही. युतीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

चंद्रकांत पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपा आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगितले नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जो कोणी केंद्रीय मंत्री असेल ते पत्रकार परिषदेत असतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, शिवसेना-भाजपामध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. शिवसेना १२६ जागांवर लढणार असून, भाजप आणि मित्रपक्षांसाठी १६२ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे, असे सुत्रांकडून समजते. एका बाजूला उद्धव ठाकरे हे युतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगतात. मात्र त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असा कुठलाही फॉर्म्युला ठरला नसल्याचा दावा करतात. त्यामुळे युतीमध्ये आणि सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम आहे.

ठरतचं नाही!

निवडणुकीचा अंतिम निर्णय राज ठाकरेंचा

बाळा नांदगावकर

आगामी विधान सभा निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक शुक्रवारी राज गडावर पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते.

ते म्हणाले की, मनसेने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्ही काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी आम्हाला निवडणूक लढवावी, असे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणूक लढवण्याच्या बाजूने आमचा कल आहे. आमची याआधीची चर्चाही सकारात्मक झाली आहे.

राज ठाकरे ईव्हीएमबाबत साशंक आहेत. तसेच ही निवडणूक ईव्हीएमवरच घेतली जाणार आहे. मात्र पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही सगळेच निवडणूक लढण्याच्या बाजूने आहोत मात्र, आमचे म्हणणे ऐकून घेऊन, आमचा अहवाल पाहून राज ठाकरे काय ते ठरवतील आणि तोच अंतिम निर्णय राहिल, असे बाळा नांदगवाकर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अजूनही निश्चित निर्णय झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या मुंबई विभाग अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राज गडावर घेण्यात आली असली तरी मात्र, या बैठकीला राज ठाकरे उपस्थितीत नसून अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असल्याचे समोर आले आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक मनसेने लढवायची की नाही? यावर चर्चा झाली आहे.