घरमुंबईवन विभागामुळे विक्रोळीची धारावी

वन विभागामुळे विक्रोळीची धारावी

Subscribe

अधिकारी, झोपडीदादांच्या संगनमताने उभे राहते झोपडपट्टी

मुंबई:- वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या वरदहस्तामुळेच विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील 165 ते 175 इमारत व प्रगती शाळेमागील नगर भूमापन क्रमांक 209 जागेवरील कांदळवन तोडून त्यावर झोपड्या बांधण्यात येत आहेत. वन विभागाकडून सुरक्षारक्षक नेमल्यानंतरही तेथे झोपड्या कशा उभारल्या जात आहेत. असा प्रश्न उपस्थित करत कन्नमवार नगरमध्ये झोपड्या वाढण्यास राजकीय नेत्यांप्रमाणेच वन विभागाचे अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरभूमापन क्रमांक 263 व 209 च्या हद्दीतील वाद आणि झोपड्यांवरील कारवाईचे प्रकरण उच्च न्यायालयात स्थगित असल्यामुळे कारवाईत अडचणी येत असल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात येत आहे.

कांदळवनाबरोबरच येथील भेंडी, पिंपळाची लहान-मोठी झाडे तोडून झोपडीदादा सर्रास झोपड्या उभारत आहेत. त्यांना विरोध करणार्‍यांना जबर मारहाणही करण्यात येत आहे. कांदळवनाच्या कत्तलीसंदर्भात वनविभागाकडे तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. तक्रारीनंतर घटनास्थळी जाऊन चौकशी करण्याऐवजी वनविभागाचे अधिकारी जीपीएसच्या माध्यमातून पाहणी करतात व कांदळवन तोडले नसल्याचा ठाम दावा करतात, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. कन्नमवार नगरमधील नागरिकांकडून वारंवार तक्रारी झाल्यानंतर नुकतेच 1 जुलैला वनविभागाकडून येथील 261 झोपड्या तोडण्यात आल्या. यावेळी नगर भूमापन क्रमांक 363 मधीलही काही झोपड्या तोडण्यात आल्याने येथील नागरिकांनी न्यायालयाकडून कारवाईवर स्थगिती आणली. त्यामुळे कारवाई थांबवण्यात आली. तसेच तेथे दोन सुरक्षारक्षकही नेमले आहेत. तरीही चार महिन्यांमध्ये तेथे पुन्हा 177 झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. कांदळवन तोडून झोपड्या उभ्या राहू नयेत यासाठी वनविभागाकडून उभारलेल्या चौकीतूनच लाईट घेऊन चौकीशेजारील जागेवर बांधकाम केल्याचेही काही नागरिकांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई उच्च न्यायालयाने 2005 नंतरच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, असा आदेश दिला आहे. कन्नमवार नगरमधील प्रगती शाळेमागील भागात नगर भूमापन क्रमांक 363 व 209 येत आहेत. यातील नगर भूमापन क्रमांक 363 हा जिल्हाधिकार्‍यांच्या अखत्यारित येत असून, यावरील झोपड्या 2005 पूर्वीच्या आहेत. तर 209 हा वनविभागाच्या अखत्यारित येतो. नगर भूमापन क्रमांक 209 वरील झोपड्या 2005 नंतरच्या आहेत, तर नगर भूमापन क्रमांक 363 वरील झोपड्या 2005 पूर्वीच्या आहेत. मात्र न.भू. क्रमांक 209 वरील झोपड्यांबरोबरच 363 वरील झोपड्यांवरही वन विभागाकडून कारवाई करण्यात येते. त्यामुळे वनविभागाच्या निष्काळजीपणाचा फटकाही येथील झोपडीधारकांना बसत आहे.

नगर भूमापन क्रमांक 209 आणि 363 चा 24 हजार स्क्वेअर फूट भाग हा वनविभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे नगर भूमापन क्रमांक 363 वरील झोपड्यांवर कारवाई करण्यात येते. परंतु न्यायालयाच्या निर्णयानुसार 2005 पूर्वीच्या झोपड्यांवर कारवाई करता येत नसल्याने हा भाग जिल्हाधिकार्‍यांकडे वर्ग करणे अपेक्षित असले तरी अद्याप तसे आदेश नसल्याने आम्हाला कारवाई करावी लागते. 1 जुलैला केलेल्या कारवाईत आम्ही 261 झोपड्या तोडल्या. मात्र न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिल्याने आम्हाला तेथे चर खोदणे शक्य न झाल्याने त्या भागात पुन्हा झोपड्या वाढल्या आहेत, अशी माहिती ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी मयुर बोठे यांनी दिली.

- Advertisement -

जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

नगर भूमापन क्रमांक 363 वरील काही रहिवासी या बेकायदा वाढणार्‍या झोपड्यांना विरोध करतात. यामुळे येथील झोपडीदादा या भागात असलेल्या बौद्ध विहाराच्या बाजूला अन्य धर्मियांच्या व्यक्तींना झोपड्या बांधण्यास सांगून नागरिकांकमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा येथील नागरिकांमध्ये जातीयतेवरून वाद निर्माण झाल्याच्या घटनाही घडत आहेत.

वन विभागाच्या कर्मचार्‍यांच्या संगनमताने झोपड्या बांधण्यात येत असल्याची लेखी तक्रार थेट माझ्याकडे करावी तसेच त्यांना पकडून दिल्यास कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.
– मयुर एस. बोठे, वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -