घरमुंबईमुंबईकर तापाने फणफणले; केईएम ओपीडीत दिवसाला ६०-७० रुग्ण दाखल

मुंबईकर तापाने फणफणले; केईएम ओपीडीत दिवसाला ६०-७० रुग्ण दाखल

Subscribe

केईएम हॉस्पिटलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही तापासाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी संध्याकाळी ही स्पेशल फिवर ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

कधी ऊन, कधी थोड्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील वातावरणात बराच बदल जाणवत आहे. पाऊस थोडला वाढला किंवा कमी झाला की, संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यात मुंबईत सध्या विविध तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही तापासाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ज्या मुंबईकरांना कामावर जाण्याच्या घाईमुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा मुंबईकरांसाठी संध्याकाळी ही स्पेशल फिवर ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

केईएममध्ये तापासाठी विशेष ओपीडी

पावसाळा सुरू झाला की खोकला, ताप, पोटदुखी, अंगदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे, विशेष सोय म्हणून केईएममध्ये संध्याकाळी ४ ते ११ या वेळेत विशेष ओपीडी सुरू करण्यात आल्याचं केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या तापाच्या रुग्णांची वाढती संख्या या ओपीडीत दिसून येत आहे. १५ जूनपासून सुरू केलेल्या या ओपीडीत मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कारणावरुन येणाऱ्या तापाच्या रुग्णांची गर्दी असते. तर, दर ओपीडीला किमान ६० ते ७० रुग्ण येतात अशी माहिती केईएमचे हॉस्पिटलचे डॉ. मिलिंद नाडकर यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. मिलिंद नाडकर यांनी सांगितलं की, ” गेल्या आठवड्यापासून केईएममध्ये ही विशेष ओपीडी सुरू केली आहे. संध्याकाळी ४ ते ११ या वेळात ही ओपीडी सुरू असते. सोमवारी एकूण ८२ तापाचे रुग्णांची ओपीडीत नोंद झाली आहे. तर, अशीच गर्दी नेहमीच्या ओपीडीसाठी असते. वेगवेगळ्या कारणांमुळे आलेल्या तापाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यात सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. पावसाळा सुरू झाला की विविध तापांसह गॅस्ट्रो , कावीळ असे आजार बळावतात. हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला अशा रुग्णांमध्ये भर पडते.

- Advertisement -

रुग्णांच्या संख्येत वाढ

ओपीडीत मेडिसीन आणि निवासी डॉक्टर्स उपलब्ध असतात. शिवाय एखाद्या व्यक्तीला जर जास्त ताप आला असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतलं जातं. त्यासाठी विशेष वॉर्डचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पाऊस पडतो, मध्येच ऊन येतं, या वातावरणाच्या फरकामुळे आजार वाढण्याची शक्यता आहे.

काय टाळावं

अनेक रुग्ण तापाकडे दुर्लक्ष करतात. औषध विक्रेत्यांकडून एखादं औषध विकत घेऊन झटपट बरं होण्याचा विचार करतात. परंतू असं करणं जीवावर बेतू शकतं. याशिवाय योग्य ती काळजी न घेतल्यास साथीचा प्रसार होऊ शकतो. असे न करता तापात डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

काय करावं

छाती आणि पाठ गरम पाण्यात कापडं भिजवून दिवसातून किमान एक-दोन वेळा शेकून घ्यावं.

बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत.

ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तापाची लक्षणं

अंग दुखी, घसा खवखवणे, डोळयातून पाणी येणे, सर्दी होणे, अंतर्गत ताप जाणवणं, थकल्यासारखं वाटणं, कणकण भासणं, सांधे दुखी, मळमळणं, डोकेदुखी होणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -