घरमुंबईताडदेव आरटीओला ‘टेस्ट ट्रॅक’ची प्रतीक्षा

ताडदेव आरटीओला ‘टेस्ट ट्रॅक’ची प्रतीक्षा

Subscribe

कामाची रखडपट्टी संपेना

ताडदेव आरटीओमध्ये वाहनांच्या ब्रेक चाचणीसह फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आवश्यक असलेला 250 मीटरचा ‘टेस्ट ट्रॅक’ बांधण्याचे काम परिवहन विभागाने हाती घेतले होते. मात्र हे काम अर्ध्यातच लटकले आहे. पूर्वी कंत्राटदाराला पैसे न मिळाल्याने आणि आता टेस्ट ट्रॅक उभारणीच्या जागी झाडे असल्यामुळे हे काम रखडले आहे. ही झाडे हटविण्यासाठी महापालिकेची परवानगी अजूनही मिळाली नाही. त्यामुळे मुंबईतील व्यावसायिक वाहन चालकांना ‘टेस्ट ट्रॅक’ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

व्यावसायिक वाहनांना दरवर्षी वाहन योग्यता प्रमाणपत्र अर्थात ‘फिटनेस सर्टिफिकेट’ घेणे बंधनकारक असते. या सर्टिफिकेट शिवाय वाहन रस्त्यावर आल्यास त्यावर आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून दंड आकारला जातो. वाहनांच्या ब्रेक चाचणीसाठी आरटीओमध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रक आवश्यक असून मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली या चार आरटीओत टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे व्यावसायिक वाहन चालकांची प्रतीक्षा यादी लांबली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही यासंदर्भात आदेश देताना 250 मीटरचा ट्रक उभारणीचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परिवहन विभागाने मुंबईतील आरटीओत वाहन तपासणीसाठी टेस्ट ट्रॅक उभारण्याची कार्यवाही सुरूही आहे. मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये टेस्ट ट्रॅकचा अभाव असल्याने मुंबईतील हजारो व्यावसायिक वाहन चालकांना पनवेलला जावे लागते. त्यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत आहे.

- Advertisement -

मागील दोन महिन्यापासून ताडदेव आरटीओमध्ये टेस्ट ट्रॅक बांधण्याचे काम सुरू आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात हा टेस्ट ट्रॅक पूर्ण होणार होता. मात्र अनेक अडचणीमुळे त्याचे काम रखडत आहे. सर्व प्रथम टेस्ट ट्रॅक उभारणार्‍या कंत्राटदाराला वेळेत निधी न मिळाल्याने हे काम अर्ध्यावर थांबले होते. त्यानंतर कागदोपत्री काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा काम सुरू झाले. मात्र या ताडदेव आरटीओच्या टेस्ट ट्रॅकच्या जागी झाडे असल्यामुळे या टेस्ट ट्रॅकचे काम पुन्हा रखडले आहे. महापालिकेकडून २१ दिवसानंतर परवानगी मिळाल्यानंतर या जागी असलेली झाडे हटवून काम मार्गी लावण्यात येणार आहे, असे आरटीओतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. याचबरोबर मुंबईतील बोरिवली आणि कुर्ल्यामध्ये टेस्ट ट्रॅक उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

१ कोटी 40 लाख खर्च
ताडदेव आरटीओत सध्या 160 मीटरचा टेस्ट ट्रॅक आहे. एक जुने बॅरेक तोडून ट्रॅक 90 मीटरने वाढविला जाणार आहे. त्याकरिता 1 कोटी 40 लाख रुपये खर्च येणार आहे. हा टेस्ट ट्रॅक जानेवारी 2019 पर्यंत सेवेत येईल, असा अंदाज पूर्वी आरटीओ अधिकार्‍यांकडून वर्तविला जात होता. मात्र या टेस्ट ट्रॅक उभारणीत अनेक अडचणी येत असल्यामुळे काम रखडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -