शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. वामन केंद्रे

आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. डिसेंबर महिन्यात गोंदिया येथे हे संमेलन पार पडणार आहे.

Mumbai
Waman kendre
प्रा. वामन केंद्रे

आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) संचालक आणि सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. येत्या २२ आणि २३ डिसेंबर २०१८ रोजी विदर्भात गोंदिया येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. दोन दिवसाच्या या संमेलनाला राज्यभरातून मराठी साहित्यावर प्रेम करणारे शिक्षक, मान्यवर हजेरी लावणार आहेत, अशी माहिती शिक्षक साहित्य संमेलन संस्थेच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा यांनी दिली आहे. आठ वर्षांपूर्वी शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी त्याचबरोबर भाषा आणि साहित्याचे अध्यापन आशय समृद्धीसाठी आमदार कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून हे संमेलन सुरु झाले. यापूर्वीची सात संमेलनं मुंबई, ठाणे, बुलडाणा, रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडली आहेत.

हेही होते अध्यक्षपदी

कवयित्री नीरजा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नाटककार शफाअत खान, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, लोकशाहीर संभाजी भगत, ख्यातनाम लेखक प्रविण बांदेकर, कवी जयवंत पाटील यांनी यापूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, हिंदूकार डॉ. भालचंद्र नेमाडे, ख्यातनाम विचारवंत प्रा. पुष्पा भावे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सुलभा देशपांडे, नितीन वैद्य, कवी वसंत आबाजी डहाके, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कादंबरीकार रंगनाथ पठारे, गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे यापूर्वीच्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संमेलनाचा नियोजित कार्यक्रम

गोंदीया येथे होणाऱ्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात दिवसभर कवी संमेलन, टॉक शो, व्याख्याने, झाडीपट्टीतील नाटके असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे, असे शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here