घरमुंबईधक्कादायक! दिव्यात लाखो लिटर पाणीचोरी

धक्कादायक! दिव्यात लाखो लिटर पाणीचोरी

Subscribe

दिव्यात लाखो लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाणी पुरवठा विभागाला दिव्यात जमिनीखाली तीन ते चार फूट खाली अनधिकृत नळजोडण्यांचे मोठे घबाडच सापडले आहे. पाण्याची ही चोरटी वाहिनी तब्बल तीन किलोमिटर लांब आहे.

जवळपास सर्वच पायाभूत सुविधांची आबाळ असणाऱ्या दिवा शहरातील नागरिकांना वर्षाच्या बाराही महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अनेक नागरिक जीव धोक्यात घालून रेल्वेने मुंब्रा गाठून तिथून पाणी भरतात. अनेकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. या भागातील पाणी पुरवठ्याची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असतानाच पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिव्यात जमिनीखाली तीन ते चार फूट खाली अनधिकृत नळजोडण्यांचे मोठे घबाडच सापडले आहे. पाण्याची ही चोरटी वाहिनी तब्बल तीन किलोमिटर लांब असून त्यावरून सुमारे दीड हजार अनधिकृत नळजोडण्या घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

सध्या दिवा शहरात ठाणे महापालिकेच्या वतीने ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत तो अतिशय कमी असून तो वाढवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिवा आणि मुंब्रा येथील पाणी पुरवठा आणि वितरण व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे. मात्र तूर्त या दोन्ही शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावते. कागदावरील आकडेवारीच्या तुलनेत पाणी टंचाईचे प्रमाण खूपच अधिक आहे. मग दररोज पुरवले जाणारे लाखो लिटर्स पाणी जाते कुठे? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. मध्यंतरीच्या काळात महापालिकेने कारवाई करून अनधिकृत नळजोडण्या खंडीत केल्या. मात्र तरीही पाणी टंचाईचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळेच अलिकडेच नव्याने अनधिकृत नळजोडण्या शोधण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली. त्या मोहीमेत हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले.

- Advertisement -

दीड हजार नळजोडणी अनधिकृत

या भागात महापालिकेची ४५० मीमी व्यासाची १८ इंचाची जलवाहीनी जमीनीखालून गेली आहे. परंतु अनेक भागात या जलवाहिनीवर टॅब मारुन अनाधिकृत जोडण्या घेण्यात आल्या आहेत. सुमारे ३ ते ४ फुट जमीनीच्या खाली हे टॅब मारण्यात आल्याचे दिसून आले असून त्यावर दीड ते दोन इंची जोडण्या देण्यात आल्या आहेत. दिवा शहरापासून तीन साडेतीन किलोमिटर अंतरावर असलेल्या निळजे, आगासनपर्यंत या अनधिकृत नळ जोडण्यांचे लोण पोहोचले आहे. या चोरीच्या नळजोडण्याची संख्या दीड हजार असावी, असा अंदाज महापालिकेतील सूत्रांकडून वर्तविण्यात आला आहे. पाच दिवसांपूर्वी चोरीने घेतलेल्या या नळजोडण्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असून अन्य अनधिकृत नळजोडण्या शोधून त्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. त्यानंतर मुख्य जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कारवाईत उघडकीस आलेली ही सर्वात मोठी पाणी चोरी असल्याचे सांगितले जाते.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -