नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

गुन्हा दाखल होताच वॉन्टेड आरोपीस अटक

Mumbai
Arrest
अटक

नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 25 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या वॉन्टेड आरोपी रेगल क्लेरियन फर्नांडिस याला डी.एन.नगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार महिला ही नवी मुंबई परिसरात राहते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वाचनात विदेशात नोकरीची संधी उपलब्ध असल्याची एक जाहिरात आली होती. एका मासिकात ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्यात रेगल फर्नांडिस याचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. तक्रारदार महिलेने या मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या नातेवाकांना विदेशात नोकरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांची अंधेरी परिसरात भेट झाली होती.

या भेटीत क्लेरियनने त्यांना त्यांच्या नातेवाकांना कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सुमारे 25 लाख रुपये घेतले होते, मात्र ही रक्कम दिल्यानंतर त्याने दिलेल्या मुदतीत त्यांना नोकरी दिली नाही. तसेच नोकरीविषयी तो नंतर टोलवाटोलवी करीत होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी डी.एन.नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या पथकातील स्वप्निल मांजरे व अन्य स्टाफने क्लेरियन फर्नांडिसला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नोकरीचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे. क्लेरियन याने तक्रारदार महिलेसह इतर दहा ते बारा जणांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता तपास अधिकारी स्वप्निल मांजरे यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here