घरमुंबईसामूहिक बलात्कार, हत्या आणि दोन खुनांनी भिवंडी हादरली

सामूहिक बलात्कार, हत्या आणि दोन खुनांनी भिवंडी हादरली

Subscribe

भिवंडी तालुक्यात विविध ठिकाणी मागील 24 तासांत हत्येच्या तीन घटना घडल्या असून सामूहिक बलात्कार आणि हत्येची एक घटना घडली आहे. यामुळे भिवंडी शहरपरिसर हादरला आहे. गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा ) येथील कामगार महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे, तर पडघा लगतच्या कुरुंद गावातील तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या झाली आहे. तिसर्‍या घटनेत तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगांव येथील सलूनमध्ये काम करणार्‍या भाऊजी-मेहुण्यांमध्ये किरकोळ वाद होऊन झालेल्या भांडणात एकाची दुसर्‍याने हत्या केली आहे.

गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाळुंगे (गोठणपाडा ) येथील महिला प्रिती दिलीप भावर (29) ही महिला अन्य महिलांसोबत वालीव, ता.वसई येथे कामावर जात होती. त्या रविवारी सायंकाळी एसटी बसने महाळुंगे बस स्टॉपवर उतरून दुकानातून घरगुती सामान खरेदी करून घराच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी दोन इसमांनी तिला उचलून निर्जनस्थळी नेवून अत्याचार केला आणि हत्या केली. रात्री उशिरापर्यंत पत्नी घरी पोहचली नाही, त्यावेळी पती दिलीप यांनी तिचा शोध घेतल्यावर ही घटना समोर आली.

- Advertisement -

रस्त्यात पडलेली चप्पल आणि रुमाल
पत्नीचा शोध घेण्यासाठी पती दिलीप यांनी प्रितीची चौकशी वहिनीकडे केली. त्यावेळी ती अन्य महिलांच्या पुढे घरी निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी दिलीप महाळुंगे नाक्याकडे निघाला व त्याने कामाच्या ठिकाणी चौकशी केली. त्यावेळी दुकानदाराने प्रिती साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानातून सामान घेऊन निघाल्याचे सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या दिलीपने रस्त्याने पायपीट करत तिचा शोध घेतला. त्यावेळी बंधार्‍याच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला प्रितीची छत्री, हातरुमाल पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने पुढे जाऊन पाहिले असता प्रिती त्या ठिकाणी निपचित पडली होती.

पोलिसांनी मृतदेह स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेला. या घटनेचे संतप्त पडसाद परिसरात उमटताच श्रमजीवी संघटनेने गणेशपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. स्थानिक रहिवाशांनीही या ठिकाणी गर्दी केली आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली. याप्रकरणी गणेशपुरी पोलिसांनी नितीन नारायण भोसले आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

- Advertisement -

या घटनेतील दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने 18 सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात येणार आहे. अशी माहिती सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी दिली.

प्रेमप्रकरणातून हत्या ?
पडघ्या लगतच्या कुरुंद गावातील सागर सुरेश पठारे (27) या तरुणाचा मृतदेह कुरुंदच्या दाता आदिवासीवाडी येथील साईनाथ भोईर यांच्या निवासी चाळीत गळफास लागलेल्या अवस्थेत सोमवारी सकाळी आढळला. सागर रविवारी रात्री दहा वाजायच्या सुमारास जेवण करून घरातून निघाला होता. तो आदिवासी वाडी येथील गणपतीत गेला असावा असे कुटुंबियांना वाटले होते. मात्र, त्याने गळफास घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांना धक्का बसला.
त्याचे येथील एका मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याची हत्या केली असावी, असा आरोप मृत सागर याच्या कुटुंबियांनी केला आहे. पडघा पोलिसांनी त्याचा मृतदेह मुंबईच्या जेजे रुग्णालयात नेला आहे. तेथील वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव येथील केशकर्तनालयात काम करणार्‍या सख्या मेहुण्यांमध्ये क्षुल्लक वाद झाल्याने या वादातून मेहुण्याने सख्या भावोजींची धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली आहे. अमिन जलील शेख (40) असे हत्या झालेल्या भावोजीचे नाव आहे. त्याचे धामणगाव येथे ए वन नावाचे सलून असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (30) हा देखील काम करीत होता. मात्र, अरमानला दारू व नशेच्या पदार्थांचे व्यसन होते. त्यामुळे अमिन हा त्याला विरोध करून नशा करण्यास मनाई करायचा. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. यावेळी अरमान याने रागाच्या भरात आपला मेहुणा अमिन याच्या डोक्यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. या घटनेचा तालुका पोलीस ठाण्यात अरमान याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्यास सोमवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -