IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटीत २७ हजार प्रेक्षक 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळणार आहे.  

भारतीय संघ लवकर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार असून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील क्रिकेट सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये होत आहेत. नुकतीच युएईत झालेली आयपीएल स्पर्धाही प्रेक्षकांविना झाली होती. परंतु, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियम जाऊन सामने पाहता येणार आहेत. १७ डिसेंबरपासून अॅडलेड येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात आसनसंख्येच्या ५० टक्के म्हणजेच २७ हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार असल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी केली.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे होईल. तर कसोटी मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबरपासून अॅडलेड येथे खेळला जाणार आहे. ‘अॅडलेड ओव्हलवर आसनसंख्येच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या प्रत्येक दिवशी २७ हजार तिकिटे उपलब्ध असणार आहेत,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमधील हा पहिलाच डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. भारताने आतापर्यंत केवळ एकच डे-नाईट कसोटी खेळली आहे.