IPL 2020 : मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली – कृणाल 

मुंबईच्या विजयात डावखुरा अष्टपैलू कृणाल पांड्याने महत्त्वाचे योगदान दिले.

krunal pandya
कृणाल पांड्या

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा आयपीएल सामना मुंबई इंडियन्सने ५ विकेट राखून जिंकला. दिल्लीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १६२ अशी धावसंख्या उभारली आणि मुंबईने हे आव्हान २ चेंडूत शिल्लक असताना पूर्ण केले. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मानला जात होता. गुणतक्त्यात हे अव्वल दोन संघ असल्याने त्यांच्याकडे सामना जिंकत अव्वल स्थान पटकावण्याची संधी होती. मुंबईने अप्रतिम कामगिरी करत अव्वल स्थानी झेप घेतली. मुंबईच्या या विजयात डावखुरा अष्टपैलू कृणाल पांड्याने महत्त्वाचे योगदान दिले. त्याने गोलंदाजीत चार षटकांत २६ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मात्र, केवळ मी नाही, तर आमच्या सर्वच गोलंदाजांनी या सामन्यात चांगली कामगिरी केली असे सामन्यानंतर कृणाल म्हणाला.

फटकेबाजी करू दिली नाही

या सामन्यातील माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे. मात्र, आमच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. खासकरून पॉवर-प्लेमध्ये आम्ही महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. टी-२० क्रिकेटमध्ये लवकर विकेट गमावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव येतो. आम्ही अखेरच्या षटकांमध्येही दिल्लीच्या फलंदाजांना फटकेबाजी करू दिली नाही. मधल्या षटकांत राहुल चहरनेही धावा रोखल्या. त्यामुळे आम्ही या सामन्यात सांघिक खेळ केला. आमच्या सर्व गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात यश आले. आमचे तीन गोलंदाज सातत्याने १४० किमीहून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करू शकतात आणि हे आमचे भाग्य आहे. जेव्हा तुमचे गोलंदाज इतक्या वेगाने गोलंदाजी करतात, तेव्हा फलंदाजांवर दबाव येतो. त्यांना धावा करणे अवघड जाते, असेही कृणाल म्हणाला.