घरक्रीडाभारताच्या ५०० व्या विजयाचे कोहली, शंकर शिल्पकार

भारताच्या ५०० व्या विजयाचे कोहली, शंकर शिल्पकार

Subscribe

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि विजय शंकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने ५ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच भारताचा हा एकदिवसीय क्रिकेटमधील ५०० वा विजय होता. अशी कामगिरी करणारा भारत हा ऑस्ट्रेलियानंतरचा केवळ दुसरा संघ आहे.

व्हीसीए जामठाच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्याचे डावपेच सफल झाले. पहिल्याच षटकात पॅट कमिन्सने रोहित शर्माला झॅम्पाकरवी झेलबाद केले. रोहित भोपळाही न फोडता माघारी परतला. डावखुरा सलामीवीर शिखर धवनने चांगली सुरुवात केली होती. मात्र, ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने त्याला पायचीत पकडले. धवनने २९ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या.

- Advertisement -

चौथ्या क्रमांकावर आलेल्या अंबाती रायडूने चाचपडत खेळत ३२ चेंडूंत १८ धावा केल्यावर ऑफस्पिनर नेथन लायनने त्याला पायचीत केले. त्यामुळे भारताची ३ बाद ७५ अशी अवस्था झाली होती. मात्र, भारताचा डाव सावरण्याची भूमिका कर्णधार विराट कोहलीने चोखपणे पार पाडली. त्याला मोलाची साथ लाभली ती नवोदित विजय शंकरची. शंकरने फटकेबाज खेळी करताना कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी अवघ्या ७१ चेंडूंत ८१ धावांची भागीदारी केली. केदार जाधव, धोनीसारखे अनुभवी खेळाडू असतानाही शंकरला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याची कोहलीची चाल यशस्वी ठरली असे वाटत असतानाच शंकर दुर्दैवी धावचीत झाला. झॅम्पाने टाकलेला चेंडू कोहलीने सरळ फाटकावला, झॅम्पाने तो अडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू त्याचा बोटाला लागून स्टंपवर गेला. नॉन-स्ट्राईकवर असलेला शंकर क्रिजबाहेर असल्याने तो धावचीत झाला. त्याने ४१ चेंडूंत ४६ धावा केल्या.

पुढे केदार ११ धावांवर तर धोनी खातेही न उघडता बाद झाला. या दोघांना झॅम्पाने लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. ६ बाद १७१ अशी अवस्था असताना कोहली आणि रविंद्र जाडेजा या सातव्या जोडीने भारताचा डाव सावरला. त्यांनी ८० चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली. जाडेजाने २१ धावा करत कोहलीला चांगली साथ दिली. दरम्यान कोहलीने कुल्टर-नाईलला चौकार लगावत १०७ चेंडूंत आपले एकदिवसीय क्रिकेटमधील ४० वे शतक पूर्ण केले. यानंतर कमिन्सने जाडेजा आणि कोहलीला बाद केले. कोहलीने १२० चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ११६ धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर अखेरचे ४ फलंदाज १२ धावांत माघारी परतले आणि भारताचा डाव ४८.२ षटकांत २५० धावांवर संपुष्टात आला.

- Advertisement -

२५१ धावांचा पाठलाग करताना कर्णधार फिंच आणि उस्मान ख्वाजा या बिनीच्या जोडीने ८७ चेंडूंत ८३ धावांची सलामी कांगारूंना करून दिली. हे दोघे मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच चायनामन कुलदीपने फिंचला ३७ धावांवर पायचीत केले. त्यापाठोपाठ केदारच्या फिरकीने ख्वाजाला चकवले आणि तो ३८ धावांवर बाद झाला. पीटर हँड्सकोम्बने एक बाजू लावून धरत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. पुनरागमन करणार्‍या शॉन मार्शला १६ धावांवर जडेजाने माघारी पाठवले. तर टी-२० सामन्यातील शतकवीर मॅक्सवेल या लढतीत पूर्णपणे अपयशी ठरला. ४ धावांवर त्याचा कुलदीपने त्रिफळा उडवला. अर्धशतकाला २ धावा हव्या असताना हँड्सकोम्ब जाडेजाच्या अचूक थ्रोमुळे धावचीत झाला. त्याने ५९ चेंडूंत ८ चौकारांसह ४८ धावा केल्या. अ‍ॅलेक्स कॅरी २२ धावांवर असताना कुलदीपने त्याचा त्रिफळा उडवला. एका बाजूला मार्कस स्टोइनिस आक्रमक फलंदाजी करत असताना बुमराहने कुल्टर-नाईल आणि कमिन्सला एकाच षटकात बाद करत सामन्यात रंगत आणली. मात्र, स्टोइनिसने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक केले. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना युवा विजय शंकरने ३ चेंडूंत २ विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक –

भारत : ४८.२ षटकांत सर्वबाद २५० (विराट कोहली ११६, विजय शंकर ४६, रविंद्र जाडेजा २१; पॅट कमिन्स ४/२९, अ‍ॅडम झॅम्पा २/६२) विजयी वि. ऑस्ट्रेलिया : ४९.३ षटकांत सर्वबाद २४२ (मार्कस स्टोइनिस ५२, पीटर हँड्सकोम्ब ४८; कुलदीप यादव ३/५४, शंकर २/१५, जसप्रीत बुमराह २/२९).

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा सामना जिंकला. हा भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील ५०० वा विजय होता. ५०० एकदिवसीय विजयांचा टप्पा गाठणारा भारत हा ऑस्ट्रेलियानंतरचा दुसरा संघ आहे. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९६३ व्या सामन्यात हा ५०० वा विजय मिळवला. भारताने ४१४ सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९२४ एकदिवसीय सामन्यांत ५५८ विजय मिळवले आहेत. सर्वाधिक विजय मिळवणार्‍या देशांच्या यादीत पाकिस्तान तिसर्‍या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत ४७९ सामने जिंकले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -