घरक्रीडाबांगलादेशची खरी कसोटी!

बांगलादेशची खरी कसोटी!

Subscribe

 भारताविरुद्धचा पहिला सामना आजपासून

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या दोन संघांमधील पहिला सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. या मालिकेतील कोलकाता येथे होणारा दुसरा सामना डे-नाईट (प्रकाशझोतात) होणार असल्याने या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दोन्ही संघांचा पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना असेल. मात्र, त्याआधी पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवण्याचे दोन्ही संघांचे लक्ष्य असेल. बांगलादेशचे प्रमुख खेळाडू तमिम इक्बाल आणि दोन वर्षांची बंदी घातलेला शाकिब अल हसन या मालिकेत खेळणार नाहीत. त्यातच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताने घरच्या मैदानावर सलग ११ कसोटी मालिका जिंकल्याने या मालिकेतही विराट कोहलीच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे या मालिकेत खर्‍या अर्थाने बांगलादेशची कसोटी लागणार आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन्ही सामन्यांचे निकाल आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार आहेत. भारताने या स्पर्धेत ५ पैकी ५ सामने जिंकत २४० गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. भारताने वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये पराभूत केल्यानंतर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेलाही ३-० असा व्हाईटवॉश दिला. आता भारताला या मालिकेत आपले अव्वल स्थान अधिक पक्के करण्याची संधी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध धावा करणे बांगलादेशच्या फलंदाजांना अवघड जाऊ शकेल. कर्णधार मोमिनुल हक हा कसोटीमध्ये बांगलादेशचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या नावे केवळ आठ कसोटी शतके आहेत. अनुभवी मुशफिकूर रहीम आणि मोहमदुल्लाह यांना कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे बांगलादेशला शाकिब आणि तमिमची उणीव भासण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

याउलट भारताचे प्रमुख तीन फलंदाज कर्णधार कोहली (२६ शतके), अजिंक्य रहाणे (११ शतके) आणि चेतेश्वर पुजारा (१८) यांनी मिळून ५० हून अधिक कसोटी शतके झळकावली आहेत. त्यातच रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. रोहितने या मालिकेच्या ३ सामन्यांत ५२९, तर मयांकने ३ सामन्यांत ३४० धावा फटकावल्या होत्या. होळकर स्टेडियममधील खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांसाठी अनुकूल असते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी मुस्तफिझूर रहमान, तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन या गोलंदाजांना सर्वोत्तम खेळ लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, शुभमन गिल, रिषभ पंत.

- Advertisement -

बांगलादेश : मोमिनुल हक (कर्णधार), इम्रुल कायेस, मुशफिकूर रहीम, मोहमदुल्लाह, मोहम्मद मिथुन, लिटन दास, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, नईम हसन, सैफ हसन, शदमन इस्लाम, तैजुल इस्लाम, अबू जायेद, इबादत हुसेन, मोसादेक हुसेन.

सामन्याची वेळ – सकाळी ९.३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -