घरक्रीडाभारताची मधली फळी कमकुवत!

भारताची मधली फळी कमकुवत!

Subscribe

भारतीय संघाची मधली फळी कमकुवत असल्याने त्यांना मागील दोन एकदिवसीय विश्वचषकांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन व्यक्त केले. भारताने २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकला. मात्र, त्यानंतर २०१५ आणि २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही विश्वचषकांत भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नव्हते. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यातही भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली होती.

भारतीय संघ दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात कशाप्रकारे पुनरागमन करतो, हे पाहण्यास मी उत्सुक आहे. ते जर प्रामाणिक असतील, तर मागील दोन विश्वचषकांत आम्ही अपेक्षित कामगिरी केली नाही, हे ते मान्य करतील. त्यांची मधली फळी कमकुवत आहे. आता यात सुधारणा करुन यजमानांनी विश्वचषक जिंकण्याची प्रथा सुरु ठेवण्यासाठी त्यांच्याकडे तीन वर्षे आहेत, असे वॉनने ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा, तसेच कर्णधार विराट कोहली यांनी मागील पाच-सहा वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर युवा फलंदाज श्रेयस अय्यरचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून त्याने आतापर्यंत १४ एकदिवसीय सामन्यांत ६ अर्धशतके झळकावली आहेत. लोकेश राहुलनेही आपल्या कामगिरी सुधारणा केली आहे, पण त्याला कोणत्या क्रमांकावर खेळवायचे हा प्रश्न संघ व्यवस्थापनसमोर आहे. रिषभ पंत, मनीष पांडे, केदार जाधव या मधल्या फळीतील फलंदाजांना मात्र अजूनही आपले संघातील स्थान पक्के करता आलेले नाही. त्यामुळे वॉनच्या म्हणण्यानुसार या फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा होणे गरजेचे आहे.

कोहलीचे कौतुक झालेच पाहिजे – गंभीर

रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल या तिन्ही फॉर्मात असलेल्या सलामीवीरांना एकत्र खेळता यावे यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला. कोहलीने अनेक वर्षे तिसर्‍या क्रमांकावर अफलातून कामगिरी केली आहे. मात्र, इतर खेळाडूंसाठी त्याने खालच्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला वाटते. काही फलंदाज आपला क्रम बदलण्यास तयार होत नाहीत. ते संघाच्या यशापेक्षा स्वतःच्या कामगिरीला जास्त महत्त्व देतात. मात्र, कर्णधार कोहलीने तसे केले नाही. रोहित, धवन, राहुल या तिघांनाही खेळता यावे यासाठी त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्याचे कौतुक झालेच पाहिजे, असे गंभीरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -