घरक्रीडाविजयीगाथा न्यूझीलंडमध्येही राहणार सुरू?

विजयीगाथा न्यूझीलंडमध्येही राहणार सुरू?

Subscribe

एकदिवसीय मालिका जिंकत ऑस्ट्रेलिया दौर्‍याचा विक्रमी शेवट करणार्‍या भारतीय संघासमोर आपली विजयीगाथा सुरू ठेवण्यासाठी आता न्यूझीलंडचे कठीण आव्हान आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नेपियर येथे होणार आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारत दुसर्‍या तर न्यूझीलंड तिसर्‍या स्थानी असल्याने ही मालिका रंजकदार होणार यात शंका नाही.

भारतासाठी न्यूझीलंडचा दौरा हा फारसा लाभदायक राहिलेला नाही. भारताने न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत ३५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी अवघे १० सामने भारताला जिंकण्यात यश आले आहे. तर, याआधी झालेल्या २०१४ च्या दौर्‍यात भारताने एकदिवसीय मालिका ०-४ अशी गमावली होती. त्यामुळे ही मालिका जिंकत आपली कामगिरी सुधारण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

- Advertisement -

भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिका जिंकली असल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यातच ऑस्ट्रेलिया मालिकेआधी आपल्या संथ खेळामुळे टीकेला पात्र ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने या मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले. त्याला रोहित शर्मा, विराट कोहली, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांनी चांगली साथ दिली. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत या फलंदाजांना टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट या दोन घातक गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यासाठी भारतीय फलंदाजांना आपला खेळ अधिक उंचवावा लागणार आहे.

दुसरीकडे भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोन वेगवान गोलंदाजांनी तसेच डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्यपूर्ण प्रदर्शन केले. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला मात्र या मालिकेत चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्याजागी तिसर्‍या सामन्यात संधी मिळालेल्या युझवेंद्र चहलने ६ विकेट घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळणार, हे निश्चित आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी या गोलंदाजांना फारशी झुंज दिली नाही. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चित्र काहीसे वेगळे असेल. त्यांच्याकडे केन विल्यम्सन आणि रॉस टेलरच्या रूपात दोन दमदार खेळाडू आहेत. रॉस टेलरने २०१८ च्या सुरुवातीपासून ९२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसाठी ही मालिका आव्हानात्मक असणार आहे.

- Advertisement -

भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला एकदिवसीय सामना हा २०१५ च्या विश्वचषकानंतर मॅक्लेन पार्कच्या मैदानावर होणारा पहिला सामना असेल. या सामन्याची खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्यात फलंदाज वर्चस्व गाजवणार की गोलंदाज त्यांना रोखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य ११ खेळाडू

भारत – शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल

न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लेथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोल्स, मिचेल सॅन्टनर, टीम साऊथी, ईश सोधी, लोकी फेर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

सामन्याची वेळी – सकाळी ७:३० पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -