घरक्रीडादक्षिण आफ्रिका मालिकेसाठीही धोनी नाहीच?

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठीही धोनी नाहीच?

Subscribe

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतले नाही. परंतु, घरच्या मैदानावर होणार्‍या आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता कमी आहे. १५ सप्टेंबरपासून धर्मशाळा येथे सुरु होणार्‍या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ४ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. धर्मशाळानंतर या मालिकेतील दुसरा सामना मोहाली (१८ सप्टेंबर) आणि तिसरा सामना बंगळुरू (२२ सप्टेंबर) येथे होणार आहे.

भारताने नुकतीच झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. त्यामुळे या मालिकेत खेळलेल्या खेळाडूंचीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होईल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषक होणार असल्याने या सामन्यांचे बरेच महत्त्व आहे.

- Advertisement -

धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर निवृत्त होईल, असे म्हटले जात होते. मात्र, त्याने अजूनही याबाबतची घोषणा केली नाही. विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी तो उपलब्ध नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत युवा रिषभ पंतला खेळण्याची संधी मिळाली. त्याने विंडीजविरुद्धच्या तिसर्‍या टी-२० सामन्यात नाबाद ६५ धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

संघ निवडीबाबतची माहिती देताना बीसीसीआयचा एक सिनियर अधिकारी म्हणाला, पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकाआधी भारतीय संघ केवळ २२ टी-२० सामने खेळणार आहे. निवडकर्त्यांनी कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचे आणि कोणाला वगळायचे याबाबत निर्णय घेतला आहे. निवृत्ती घ्यायची की नाही, हे ज्या-त्या खेळाडूने ठरवले पाहिजे. निवड समिती किंवा कोणालाही, कोणी कधी निवृत्त व्हायचे हे ठरवण्याचा अधिकार नाही. मात्र, टी-२० विश्वचषकावर नजर ठेऊन कोणाला निवडायचे याबाबतचा निर्णय निवड समिती नक्कीच घेऊ शकते. रिषभ पंतला जास्तीतजास्त संधी मिळावी, असे त्यांना वाटत असल्यास, ते त्यालाच संघात घेतील.

- Advertisement -

सॅमसन, किशनला मिळणार संधी?

भारताच्या टी-२० संघात रिषभ पंत हा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज असला, तरी त्याच्या नंतर कोण, हा प्रश्न निवड समितीपुढे आहे. त्यांनी महेंद्रसिंग धोनीला संघात न घेण्याचा निर्णय घेतल्यास संजू सॅमसन किंवा ईशान किशन यांना संधी मिळू शकेल. या दोघांनाही मागील काही काळात भारत अ संघात संधी देण्यात आली आहे. मात्र, या दोघांनाही सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -