घरक्रीडाऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकप उचलणार?

ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा वर्ल्डकप उचलणार?

Subscribe

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत क्रिकेट जगतातील सर्वात बलाढ्य संघ कोण असे विचारले असता ऑस्ट्रेलिया हेच नाव पुढे यायचे. २०१५ मध्ये आपल्या घरच्या मैदानावर झालेला विश्वचषकही त्यांनीच जिंकला. मात्र, मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे हा संघ अडचणीत सापडला होता. या प्रकरणातील सहभागामुळे त्यांचे प्रमुख फलंदाज डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

त्यांच्या अनुपस्थितीत या संघाची कामगिरी खालवण्यास सुरुवात झाली, मग ते कसोटी क्रिकेट असो एकदिवसीय क्रिकेट असो की टी-२०. त्यामुळे आगामी विश्वचषकात गतविजेता हा संघ जेतेपदाची पुनरावृत्ती करेल असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, सहजासहजी हार मानेल आणि तगडी टक्कर देणार नाही, तो ऑस्ट्रेलियन संघ कसला! त्यांनी बॉल टॅम्परिंग प्रकरणातून हळुहळू सावरून आपले प्रदर्शन सुधारण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

खासकरून अ‍ॅरॉन फिंचच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने मागील २ एकदिवसीय मालिकांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांनी भारतात येऊन भारताचा एकदिवसीय मालिकेत ३-२ असा तर पाकिस्तानचा युएईमध्ये ५-० असा पराभव केला. त्यातच आता वॉर्नर आणि स्मिथ यांच्या बंदीचा कालावधी संपला असून, त्यांची विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली आहे. या दोघांनीही नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. खासकरून वॉर्नरने १२ सामन्यांत ६९.२० च्या सरासरीने ६९२ धावा केल्या होत्या. तोच या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळे या दोघांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा मजबूत झाला असून, या विश्वचषकात ते आपल्या सर्वोत्तम संघानिशी उतणार आहेत.

फलंदाजीत वॉर्नर आणि स्मिथच्या साथीला फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस असे तगडे फलंदाज आहेत. यापैकी वॉर्नर, स्मिथ, फिंच आणि मॅक्सवेल हे मागील विश्वचषकातही खेळले असल्याने त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. तसेच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नेथन कुल्टर-नाईल, जेसन बेहरनडॉर्फ असे वेगवान गोलंदाज आहेत, जे इंग्लंडमधील पाटा खेळपट्ट्यांवरही फलंदाजांना अडचणीत टाकू शकतील. त्यांना अ‍ॅडम झॅम्पा आणि नेथन लायन या फिरकीपटूंचीही चांगली साथ मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा विश्वचषक जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात नसले तरी त्यांना हलक्यात घेणे इतर संघांना महागात पडू शकेल.

- Advertisement -

जमेची बाजू – डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खूप मजबूत झाली आहे. वॉर्नर संघात परतल्याने तो आणि अ‍ॅरॉन फिंच ही सलामीची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. मागील विश्वचषकातही या दोघांनीच ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली होती. गोलंदाजीत पूर्णपणे फिट होऊन संघात परतलेला मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स मिळून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणून ऑस्ट्रेलिया सामना जिंकवून देण्यात सक्षम आहेत. तसेच स्मिथ नसताना ग्लेन मॅक्सवेलने मधल्या फळीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत ऑस्ट्रेलियाला काही सामने जिंकवून दिले होते. तो या विश्वचषकातही आपली चांगली कामगिरी सुरू ठेवेल अशी ऑस्ट्रेलियाचे संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना अपेक्षा असेल.

कमकुवत बाजू – विश्वचषकासाठी पीटर हँड्सकोम्बला संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे या संघात अ‍ॅलेक्स कॅरीच्या रूपात केवळ एकच यष्टीरक्षक आहे. त्याला जर सामन्यादरम्यान दुखापत झाली, तर ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडेल. तसेच इंग्लंडच्या हवामानात लेगस्पिनर अ‍ॅडम झॅम्पा आणि ऑफस्पिनर नेथन लायन हे दोन फिरकीपटू मधल्या षटकांत किती यशस्वी होतील याबाबतही साशंकता आहे.

विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, स्टिव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, नेथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, जेसन बेहरनडॉर्फ, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झॅम्पा, नेथन लायन

(खेळाडूवर लक्ष) –
डेविड वॉर्नर [फलंदाज]
एकदिवसीय सामने : १०६
धावा : ४३४३
सरासरी : ४३.४३
स्ट्राईक रेट : ९६.५५
सर्वोच्च : १७९

विश्वविजेते – ५ वेळा (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५)

-(संकलन – अन्वय सावंत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -