महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा

Mumbai
नाशिकच्या श्रावणी वाळेकरचा दुहेरी धमाका

पुणे येथे झालेल्या १० आणि १३ वर्षांखालील मुले-मुली महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या श्रावणी वाळेकरने लक्षवेधी कामगिरी केली. तिने १३ वर्षांखालील मुलींमध्ये मुंबईच्या नायेशा भटोयेचा पराभव करून एकेरीचे जेतेपद पटकावले. १३ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत श्रावणीने मुंबईच्या तारिणी सुरीच्या साथीने दुसर्‍या सीडेड कुंजल मंडलिक आणि क्रिशा सोनी या जोडीला नमवत जेतेपदावर मोहर उमटवली.

याच स्पर्धेत १० वर्षांखालील वयोगटात नाशिकच्या दर्शिता राजगुरूनेही दर्जेदार खेळ करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत तिने निमिषा कोटेचाला चांगली झुंज दिली, पण तिने हा सामना १५-२१ आणि १६-२१ असा गमावला. त्यामुळे दर्शिताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

श्रावणी वाळेकर आणि दर्शिता राजगुरू यांनी याआधी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवले. श्रावणीने दोन महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. श्रावणी आणि दर्शिता या दोघी शिवसत्य क्रीडा मंडळात मकरंद देव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल शिवसत्य मंडळाचे उपाध्यक्ष अनिल सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राध्येश्याम मुंदडा, अनंत जोशी, सचिव योगेश एकबोटे आणि सर्व पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here