घरक्रीडानदाल अजिंक्य; सेरेनाची दुखापतीमुळे माघार

नदाल अजिंक्य; सेरेनाची दुखापतीमुळे माघार

Subscribe

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने अंतिम सामन्यात रशियाच्या डॅनिल मेडवेडेव्हचा ६-३, ६-० असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत एटीपी मॉन्ट्रियॉल मास्टर्स टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. मागील वर्षी टोरंटो येथे झालेली स्पर्धा जिंकणार्‍या नदालने केवळ ७० मिनिटांत कॅनडामधील पाचवी स्पर्धा जिंकली. हे त्याचे ३५ वे मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद होते. गिल मॉनफिल्सने दुखापतीमुळे माघार घेतल्याने नदालला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सामना खेळावा लागला नाही. याचा फायदा त्याला अंतिम सामन्यात मिळाला.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्याची नदालने उत्कृष्ट सुरुवात केली. त्याने आपली सर्व्हिस राखत, मेडवेडेव्हची सर्व्हिस २ वेळा मोडली. त्यामुळे त्याला ४-१ अशी मोठी आघाडी मिळाली. यानंतर मेडवेडेव्हने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, नदालची सर्व्हिस मोडण्यात मेडवेडेव्हला अपयश आले. त्यामुळे नदालने पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये नदालने अधिकच अप्रतिम खेळ केला. त्याने या सेटमध्ये मेडवेडेव्हची सर्व्हिस सलग ३ वेळा मोडली, तर आपली सर्व्हिस राखली. त्यामुळे त्याने दुसरा सेट ६-० असा जिंकत हा सामनाही जिंकला. मात्र, ही स्पर्धा जिंकूनही तो जागतिक क्रमवारीत दुसर्‍याच स्थानी कायम राहिला. या क्रमवारीत नोवाक जोकोविच अव्वल स्थानी आहे.

- Advertisement -

महिलांच्या अंतिम लढतीत अमेरिकेची महान खेळाडू सेरेना विल्यम्सला पाठदुखीमुळे अर्ध्या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे कॅनडाची युवा खेळाडू बियांका आंद्रेस्कुला या स्पर्धेचे जेतेपद मिळाले. सामना संपल्यानंतर सेरेना चाहत्यांना म्हणाली, मला माफ करा, मी हा सामना पूर्ण करू शकले नाही. मी प्रयत्न केला, पण मला खेळणे शक्य झाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -